राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा २ मे रोजी केली होती. मात्र, पदाथिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला आहे. शरद पवार यांनी शुक्रवारी मुंबईतील यशवंतराव प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत यासंदर्भात घोषणा केली. दरम्यान, या निर्णयावर आता विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी बोलत होते.
हेही वाचा – बारसूमध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेला परवानगीस नकार; प्रकल्प समर्थकांच्या मोर्चालाही मनाई
काय म्हणाले संजय शिरसाट?
“तुम्ही दोन तारखेचा एपिसोड व्यवस्थित बघितला तर, जेव्हा शरद पवारांनी राजीनामा दिला, तेव्हा याबाबतचा कोणताही तणाव सुप्रिया सुळे यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. त्यावेळीच मनात शंका नक्कीच झाली. शरद पवार एवढ्या मोठ्या पदाचा राजीनामा देत आहेत आणि राजकारणातून बाजूला होत आहेत आणि सुप्रिया सुळे यांच्या चेहऱ्यावर तणाव नाही. याचा अर्थ काही तरी घडत आहे, हे नक्की होतं”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली.
“या संपूर्ण राजीनामा नाटकात सर्वात मोठी भूमिका पवारांच्या सहकाऱ्यांनी निभावली. शरद पवारांनी पक्षांतर्गत लोक आणि जे कुणी विरोध करत आहेत, त्यांचा या राजीनामा नाट्यात करेक्ट कार्यक्रम केला. आता पुन्हा अशी हिंमत कराल तर मी माझा बडगा तुम्हाला दाखवीन, असा इशारा शरद पवारांनी या राजीनामा नाट्यातून दिला आहे”, असेही ते म्हणाले.
“या संपूर्ण घटनेतून शरद पवार यांनी आपल्या ताकदीची परीक्षा घेतली. तसेच पक्षांतर्गत बंडाळीची जी चिन्हं दिसत होती, त्याला शमवण्यासाठी केलेले हे एक प्रकारचे नाटक जरी असले, तरी तो एक इशारा त्यांनी या माध्यमातून दिला आहे”, असंही त्यांनी नमूद केलं.
“शरद पवार हे मोठे राजकारणी आहेत. त्यांनी योग्य वेळी टाकलेली ही गुगली होती. शरद पवार हे एवढे साधे नाहीत. त्यांनी यातून अनेकाचा करेक्ट कार्यक्रमही केला आणि ज्यांना इशारा द्यायचा त्यांना इशाराही दिला”, असेही ते शिरसाट यांनी सांगितलं