माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद जिल्ह्याचा दौरा केला आहे. त्यांनी पेंढापूर येथे शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. दरम्यान, त्यांनी ओल्या दुष्काळाचीही पाहणीही केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दर हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावरून आता राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत.
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून खोचक टीका केली आहे. संबंधित दौऱ्याबाबत प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले, “उद्धव ठाकरे आज १५ मिनिटांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले होते, याची मी बातमी पाहिली. मला वाटतं की, सर्वसामान्य शेतकऱ्याच्या किंवा कार्यकर्त्याच्या घरी चहा प्यायला गेलं तरी २० मिनिटं लागतात. पण १५ मिनिटांत दुष्काळ पाहणी दौरा होतं असेल तर यासारखं आश्चर्य नाही.”
उपरोधिक टीका करत संजय शिरसाट पुढे म्हणाले, “मला फक्त एकच गोष्ट खटकली. आमचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरेंची प्रकृती ठीक नसताना, त्यांना असं दौऱ्यावर बोलवायला नको होतं. त्यांना औरंगाबादमध्ये बोलावून त्रास का दिला? हा माझा प्रश्न आहे. आपल्याकडे कंत्राटावर भरती झालेले काही कार्यकर्ते आहेत, जे आजकाल भाषणं करतात. त्यांना दौरा करायला लावायला हवं. कारण त्यांनी केवळ भाषणं करायची आणि आम्ही टाळ्या वाजवायच्या, यासाठी शिवसेनेचा जन्म झाला नाही.”
हेही वाचा- बच्चू कडू आणि रवी राणांमधील वाद पेटला; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?
“नवीन कार्यकर्त्यांनाही कळू द्या, शिवसैनिकाची मेहनत काय असते? उद्धव ठाकरे ओला दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आले, याबद्दल स्वागतच आहे. पण ते येऊन लगेच ताबोडतोब निघून गेले. हे काही दिलासा देण्यासारखं नाही. असाच दिलासा त्यांनी आम्हाला दिला असता तर एवढं रामायण घडलंच नसतं” असा टोलाही शिरसाटांनी लगावला.