देशात २०२४ साली लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर ‘इंडिया टुडे सी-वोटर’चा सर्व्हे समोर आला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडीला लोकसभेला ३४ जागा मिळणार असल्याचं दाखवलं आहे. तर, शिंदे गट आणि भाजपाची पिछेहाट झाल्याचं दिसत आहे. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत वाद रंगला आहे. याच संदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून शिंदे गटाने प्रत्युत्तर दिलं आहे.
या सर्व्हेबद्दल बोलताना तो विश्वासार्ह नसल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं होतं. तसेच, “आमची आघाडी येत्या लोकसभा निवडणुकीत सर्व विक्रम मोडीत काढेल. अशा सर्व्हेची आम्हाला गरज नाही,” असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. यावरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला आहे.
हेही वाचा : “मनसेने आम्हाला शहाणपण शिकवू नये”, शरद पवारांचं नाव घेत आशिष शेलारांचं मनसेवर टीकास्र!
“महाविकास आघाडीला लोकसभेच्या साधारण…”
“जेव्हा त्यांच्या सोयीचे सर्व्हे असतात, तेव्हा ते हवे असतात. राष्ट्रीय स्तरावरचा सर्वे भाजपाच्या बाजूने आहे, तो त्यांना हवा आहे. पण, महाराष्ट्रातला सर्व्हे त्यांच्याविरोधात आहे. तो त्यांना नको आहे. त्या सर्व्हेनुसार महाविकास आघाडीला लोकसभेच्या साधारण ३४ जागा मिळतील, असा अंदाज आहे. मात्र, आम्ही म्हणतो या जागा ४० ते ४५ असतील. मुख्यमंत्री म्हणाले की महाविकास आघाडीला ४-५ जागा मिळाल्या तरी पुरे. माझं म्हणणं की त्यांनी कल्याण-डोंबिवलीची जागा जरी वाचवली तरी पुरे”, असा टोमणा खासदार श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघावरून राऊतांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
“म्हणून स्वत:ची लायकी…”
याला आता शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “संजय राऊतांना कल्याण-डोंबिवलीचं काय माहिती आहे. कोणता भाग, मतदार, परिसरात किती पदाधिकारी आहेत, यांची राऊतांना माहिती नाही. तरीही ते कशावरही बोलतात. त्यामुळेच प्रकाश आंबेडकरांनी तुमची जागा दाखवली आहे. काल तुमच्याबरोबर खूर्ची लावून बसलेले, म्हणत आहेत, संजय राऊतांना मी ओळखत नाही. म्हणून स्वत:ची लायकी ओळखून भाष्य करावं. तुमच्या विधानांमुळे पक्ष बुडणारच आहे. तसेच, लोकांची दिशाभूल करताय,” असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.
“आम्ही सर्व्हेवर जाणारी…”
“सर्व्हेचा संजय राऊतांना अत्यंत आनंद झाला आहे. कारण, राऊत हे कधीच जनतेत फिरत नाहीत. हे फक्त भांडूप ते मातोश्री आणि प्रभादेवीत फिरतात. ते आता सर्व्हेबद्दल बोलत आहेत. सर्व्हेची आम्हाला चिंता नाही. आम्ही सर्व्हेवर जाणारी माणसे नाहीत,” असं संजय शिरसाट यांनी सांगितलं.