शिवसेनेने ( ठाकरे गट ) ‘सामना’ अग्रलेखातून शिंदे गटावर टीकास्र डागलं आहे. “मिंधे गटाच्या चाळीस कोंबड्या महाराष्ट्रात आणि १३ तुर्रेबाज कोंबडे भाजपाच्या खुराड्यात बंदीवान आहेत. त्यांच्या मानेवरून कधी सुऱ्या फिरतील सांगता येत नाही,” अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे. याला शिवसेना ( शिंदे गट ) आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
‘सामना’त नेमकं काय म्हटलं?
“गरज सरो वैद्य मरो हेच भाजपाचे काम व ज्याच्या खांद्यावर हात ठेवायचा त्याचा खेळ खल्लास करायचा हेच त्यांचे धोरण. म्हणूनच शिवसेनेने स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वाभिमानी बाण्याने भाजपपासून लांब जाणे पसंत केले. श्रीमंतांची गुलामी पत्करण्यापेक्षा आपली स्वाभिमानाची मीठ–भाकरी बरी हे धोरण अवलंबिले,” असं ठाकरे गटानं सांगितलं.
“भाजपास विरोधकांचे सोडाच, पण आपल्या मित्रांचे व सहकाऱ्यांचेही ‘हित’ बघवत नाही. मिंधे गटाच्या चाळीस कोंबड्या महाराष्ट्रात व 13 तुर्रेबाज कोंबडे भाजपाच्या खुराडय़ात बंदीवान आहेत. त्यांच्या मानेवरून कधी सुऱ्या फिरतील सांगता येत नाही,” असेही ठाकरे गट म्हणाला. यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
“‘सिल्व्हर ओक’वर मुजरा घालणारे लोक…”
“‘सामना’त आता लिहण्यासारखं आता काही राहिलं नाही. स्वत:च्या लाचारीची लत्करे वेशीवर टांगू शकत नाहीत. कारण, मागील काही दिवसांत ‘सिल्व्हर ओक’वर मुजरा घालणारे लोक तुम्ही पाहिले आहेत. त्यात उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचा समावेश आहे. पण, यांना काँग्रेस आणि राष्ट्रवालीवाले सुद्धा विचार नाहीत. आम्हाला पाठिंबा द्या, असं म्हणायला सुद्धा कोणी जात नाही,” असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला आहे.
“स्वत: खुडूक आणि कोंबड्याही…”
“‘मातोश्री’चं वजन घालवणारे हे लोक आम्हाला कोंबड्या म्हणत आहेत. दुसऱ्या पक्षाच्या खुडूक कोंबड्या यांच्या पक्षात घेत आहेत. स्वत: खुडूक आणि कोंबड्याही खुडूक आहेत,” असा टोमणा संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे लगावला आहे.
हेही वाचा : “एक महिला म्हणून…”, न्यायालयाने सुनावल्यानंतर नवनीत राणांची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “उद्धवसाहेबांची ही देण…”
“फक्त तुम्ही मुजरे घालत आहात, त्यामुळे…”
‘आधी दाणा, मग कापती माना,’ असेही ‘सामना’त म्हटलं आहे. त्यावर संजय शिरसाट म्हणाले की, “आता दाणा टाकतील की पंचपक्वानाचं ताट देतील, याची चिंता करण्याची गरज नाही. आमच्या माना राहतील की जातील याचीही चिंता करू नये. फक्त तुम्ही मुजरे घालत आहात, त्यामुळे कंबरदुखी होईल याची काळजी घ्या,” असा खोचक सल्ला शिरसाट यांनी ठाकरे गटाला दिला आहे.