शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांना वरळीतून माझ्या विरोधात निवडणूक लढण्याचे आव्हान दिले होते. आदित्य ठाकरे यांच्या आव्हानानंतर शिंदे गटातील अनेक नेत्यांनी आदित्य यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. त्यानंतर आता शिंदे गटाचे लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या खास शैलीत आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. वृत्तवाहिन्यांशी बोलत असताना ते म्हणाले, “आदित्य ठाकरे यांनी लवकरच राजीनामा द्यावा आणि मंजूर करुन घ्यावा. त्यांनी टीव्हीवर आव्हान देऊ नये. पटकन राजीनामा लिहायचा आणि राज्यपालांकडे द्यायचा. मग मैदानात उतरण्याचे आव्हान द्यावे. आम्ही बारक्या मुलाकडून त्यांचा पराभव करु”
आम्ही फाटक्या माणसाकडून तुमचा पराभव करु
शहाजीबापू पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्वसामान्य कार्यकर्ता आदित्य ठाकरेंचा वरळीत दारूण पराभव करेल. त्यासाठी एकनाथ शिंदे यांची गरज नाही. एखाद्या फाटक्या माणसाकडून आम्ही तुमचा पराभव करुन दाखवू कारण तुम्ही हिंदूहृदय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडून सत्येसाठी ज्या पद्धतीने तीन वर्षात उलाढाली केल्या. त्या महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या कुठल्याही शिवसैनिकाला आणि शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या माणसाला आवडलेल्या नाहीत.
हे वाचा >> शिंदे – फडणवीस सरकार सत्तारुढ झाल्यानंतर जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च; RTI मधून ‘एवढी’ रक्कम उघड
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
मुंबई मनपाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. एका वर्षापासून मुंबई मनपामध्ये हुकूमशाही सुरु आहे. मनपाची निवडणूक घेण्यात येत नाही. प्रशासक नेमूण कामकाज सुरु आहे. मी असंवैधानिक मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, मी माझ्या जागेचा राजीनामा देतो, त्यांनीही त्यांच्या जागेचा राजीनामा द्यावा आणि माझ्याविरोधात वरळीतून निवडणूक लढवून दाखवावी.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून वरळी विधानसभेतील ठाकरे गटाच्या नेत्यांना खेचण्याचा प्रयत्न सुरु आहे. नुकतेच वरळीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक संतोष खरात यांनी शिंदे गटात (बाळासाहेबांची शिवसेना) प्रवेश केला आहे. शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला विशेष करून आदित्य ठाकरेंसाठी हा धक्का असल्याचे मानले जात आहे. वरळीत शिंदे गट सक्रीय झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच निवडणूक लढण्याचे आव्हान दिले आणि त्यानंतर वाद सुरु झाला.
हे देखील वाचा >> “राज ठाकरेंनी पत्र लिहिले, मुख्यमंत्र्यांनी फोन केला तरीही..”, संजय राऊत यांचे चिंचवड-कसबा पोटनिवडणुकीबाबत मोठं वक्तव्य
वरळी मतदारसंघात शिंदे – फडणवीस यांचा सत्कार
आदित्य ठाकरे यांनी आव्हान दिल्यानंतर शिंदे गटाकडून ऑपरेशन वरळी सुरु करण्यात आल्याचे चित्र दिसत आहे. वरळीतील कोळी समाजाकडून ७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार होणार आहे. नेव्हिगेशन स्पॅन मिळवून दिल्याबद्दल हा सत्कार होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाषण देणार असून ते आपल्या भाषणात आदित्य ठाकरे यांना काय प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.