राज्यात तीन महिन्यांपूर्वी मोठं सत्तानाट्य घडलं. एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेत बंडखोरी करत भाजपाबरोबर सत्तास्थापन केली. त्यानंतर अनेकवेळा शिंदे गटातील आमदार मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चा होत्या. त्यातच आता एकनाथ शिंदेबरोबर पहिल्यांदा सुरतला जाणारे नांदगाव मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे हे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता सुहास कांदे यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर आले होते, तेव्हा मी भेटू शकलो नाही. तसे मुख्यमंत्र्यांना कळवलंही होतं. मात्र, सरकारच्या कोणत्याही बैठकीला मला बोलवलं जात नाही. यापूर्वी, तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ किंवा गिरीष महाजन यांचे जनसंपर्क अधिकारी बैठकांची माहिती द्यायचे. पण, मंत्री दादा भुसे यांच्याकडून बैठकांबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात येत नाही,” अशी उघडउघड नाराजी सुहास कांदे यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : जितेंद्र आव्हाडांच्या अटकेवरून एकनाथ शिंदेंची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाले, “राजकीय…”
तसेच, शिंदे गटाच्या बैठकांना सुद्धा तुमची हजेरी नसते, यावरही सुहास कांदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “मला पक्षाच्या बैठकांना बोलवलं जात नाही. पक्षाचे कार्यालय कुठे आहे, याचीही माहिती नाही. त्यामुळे बोलवले नाहीच तर जाऊ कसा. तसेच, नव्या पक्षनिवडींमुळे पक्षाची वाटचाल थांबली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरे गटातील नगरसेवक आणि सरपंच यांचे प्रवेश या नेमणूकांमुळे थांबली आहेत. मी एकनाथ संभाजी शिंदे या व्यक्तीवर प्रेम करणारा आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अथवा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रेम करणारा नाही,” असेही सुहास कांदे यांनी सांगितलं आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.