मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतंच अयोध्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिंदे गटाचे आमदार, खासदार, नेते, पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्तेही होते. पण या दौऱ्यात शिंदे गटाचे काही आमदार आणि खासदार गैरहजर राहिले. त्यामुळे शिंदे गटातील एक गट अस्वस्थ असल्याचं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राऊतांच्या या विधानावर शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी मोठं विधान केलं आहे. शिंदे गटातील कोणताही आमदार किंवा खासदार नाराज नाही. ठाकरे गटाच्या लोकांनी पारावरच्या गप्पा मारणं बंद करावं, असा टोला भावना गवळी यांनी लगावला. तसेच ठाकरे गटाचे काही आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत. तेच स्वत:च काही दिवसांत बंडखोरी करतील, असं सूचक विधान भावना गवळी यांनी केलं. त्या ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होत्या.

हेही वाचा- “अयोध्येत मशीन लावून खून…”, एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यातील ‘त्या’ गुंडाचा उल्लेख करत अंबादास दानवेंची टीका!

संजय राऊतांच्या टीकेबद्दल विचारलं असता भावना गवळी म्हणाल्या, “आजकाल काही लोकांना पारावरच्या गप्पा मारण्याची खूप सवय लागली आहे. खरं म्हणजे, कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी मी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले होते. पण काल अयोध्येला जाण्याआधी माझं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बोलणं झालं होतं. मी या दौऱ्याला येऊ शकणार नाही, तसं मी मुख्यमंत्र्यांना कळवलं होतं. श्रीकांत शिंदे यांच्याशीही माझं बोलणं झालं होतं.”

हेही वाचा- “संजय राऊत महाराष्ट्रातील सर्वात मोठा गुंड आणि चोर, त्यांनी…”, शहाजीबापू पाटलांचं विधान!

“पण काही लोक आता वावड्या उठवायच्या आणि बोलत राहायचं, असं करत आहेत. खरं म्हणजे, ठाकरे गटातील काही आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात आहेत. ते म्हणतायत… थोडं थांबा, काही दिवसांत आम्ही काय करतो? ते पाहा. त्यामुळे विनाकारण अशा वावड्या उठवण्यात काही अर्थ नाही. तसेच तशा गप्पा मारण्यातही काही अर्थ नाही, असं विधान भावना गवळी यांनी केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde group mp bhavana gawali reaction on sanjay raut statement ayodhya visit mla mp upset rmm
Show comments