हिंगोलीत सात महिन्यानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी ( ६ जानेवारी ) ऑनलाईन पद्धतीनं पार पडली. या बैठकीत पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि खासदार हेमंत पाटील यांच्यात जोरदार तू-तू-मैं-मैं झाली होती. स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याच्या निधीचा वाटेल तसा वापर केला असल्याची तक्रार हेमंत पाटलांनी केली होती. यावर ‘तुम चूप बैठो’ असं उत्तर अब्दुल सत्तारांनी दिलं होतं. तेव्हा हेमंत पाटील आणि अब्दुल सत्तारांमध्ये शिवराळ भाषेत जोरदार खडाजंगी झाली.
शिंदे गटातील हेमंत पाटील आणि अब्दुल सत्तार हे दोन्ही नेते एकमेकांना भिडल्यानं चर्चेचा विषय ठरला होता. आता पुन्हा हेमंत पाटलांनी अब्दुल सत्तारांवर टीका केली आहे. ते ‘मुंबई तक’शी संवाद साधत होते.
“…तर राग येण्याचं कारण नव्हतं”
हेमंत पाटील म्हणाले, “हिंगोली हा राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला जिल्हा आहे. सात महिने झालं जिल्हा नियोजन मंडळाची बैठक झाली नाही. आताही ऑनलाईन बैठक घेण्यात आली. मागील वर्षी रोहित्रे विकत घेण्यासाठी एकमतानं ठराव मंजूर करत पैसे वर्ग करण्यात आले होते. पण, नंतर ते पैसे वळवण्यात आले. वीजेची मोठ्या प्रमाणात अडचण असताना रोहित्र्याचे पैसे अन्य कामासाठी वापरण्यात आले. याबद्दल प्रश्न विचारल्यास राग येण्याचं कारण नव्हतं.”
हेही वाचा : जमाखर्च : अब्दुल सत्तार, कृषिमंत्री; सरकारची ‘नामी – बदनामी’ करणारे मंत्री
“सत्तार कुठल्या संस्कृतीतून आले आम्हाला माहिती”
“तसेच, स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाणीच्या पैशांचा वापर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी करणं चुकीचं आहे. याबाबत प्रश्न विचारल्यावर माझा माइक बंद करण्यात आला. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. अंगावर आला, तर शिंगावर घेणार माणूस आहे. सत्तार कुठल्या संस्कृतीतून आले आम्हाला माहिती आहे. पहिल्यांदा सत्तारांनी शिवराळ भाषेचा वापर केला. एकाच सरकारमधील असलो, तरी प्रत्येकांना एकमेकांचा मान-सन्मान राखला पाहिजे,” असं हेमंत पाटलांनी म्हटलं.
“जिल्हा नियोजन मंडळाची बैठक ऑनलाईन कशासाठी घेतली?”
“अब्दुल सत्तार पालकमंत्री असून त्यांनी हिंगोली जिल्ह्यात यावं. सात महिन्यानंतर जिल्हा नियोजन मंडळाची बैठक ऑनलाईन कशासाठी घेतली? हिंगोली मागासलेला जिल्हा असून दोन-तीन महिन्यांनी प्रश्न समजून घेतले पाहिजेत,” असं हेमंत पाटील म्हणाले.
हेही वाचा : उलटा चष्मा : सत्ता(र) कोणत्या दिशेने?
“…तर शिवसैनिक सत्तारांची दखल घेतील”
“मी, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार केली आहे. १५ ऑगस्टला पालकमंत्री आले नव्हते. २६ जानेवारीला नाही आले, तर शिवसैनिक सत्तारांची दखल घेतील,” असा इशाराही हेमंत पाटलांनी दिला आहे.