अलिबाग :  नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या भूमिकेमुळे अलिबाग विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले होते. भाजप आणि शिवसेना वाद शेकापच्या पथ्यावर पडला होता. यानंतर शिवसेनेचा शिंदे गट भाजपविरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. शेकापची दुसरी फळी म्हणून जर भाजप नेते काम करणार असतील तर यापुढे कुठल्याच पातळीवर भाजपशी सलगी नको असा पवित्रा शिवसेनेच्या शिंदे गटाने घेतला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघही शिवसेनेला मिळावा अशी मागणी त्यांनी केली. पदाधिकाऱ्यांच्या या मागणीला अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनीही पाठिंबा दर्शवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “जवळच्या माणसानेच पंकजा मुंडेंचा घात केला”; बच्चू कडूंचं थेट वक्तव्य, म्हणाले…

अलिबाग, मुरूड आणि रोहा तालुक्यातील शिवसेना शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा अलिबाग येथील होरायझॉन सभागृहात पार पडला. या वेळी ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या आणि लढलेल्या उमेदवारांचा पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मित्रपक्षांच्या निवडणुकीतील भूमिकेचा समाचार घेतला. जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी भाजपवर टीकास्त्र डागले. शेकापमधून भाजपमध्ये आलेले काही नेते ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार पडावे यासाठी कार्यरत होते. शेकापची दुसरी फळी म्हणून त्यांनी आपली भूमिका बजावली. यामुळे शिवसेनेच्या अनेक उमेदवारांचा थोडक्या मतांनी पराभव झाला. याचा फटका पक्षाला बसला. भाजपला निवडणुकीत फारसे यश मिळाले नाहीच पण त्यांच्या भूमिकेमुळे शेकापचा फायदा झाला. त्यामुळे मित्र पक्ष असलेल्या भाजपकडून सातत्याने अशी भूमिका घेतली जात असेल. तर पक्षानेही वेगळा विचार करायला हवा अशी मागणी जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी केली. रायगड लोकसभेची जागा शिवसेनेची होती. त्यामुळे ही जागा पक्षाने मागून घ्यावी अशी भूमिका त्यांनी मांडली. अलिबागचे शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी या मागणीला पाठिंबा दर्शवला. मतदारसंघात इंडिया आघाडी अथवा शेकापचे आव्हान नाही. खरे आव्हान हे मित्र पक्ष असलेल्या भाजपचे आहे. हीच परिस्थिती राहिली तर पक्षाला वेगळा विचार करावा लागेल. भाजपने आडमुठी भूमिका घेतली असली तरी, त्यात त्यांचेही नुकसान झाले. भाजपकडे होत्या त्या ग्रामपंचायती पक्षाने गमावल्या. उलट शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवून सर्वाधिक सदस्य निवडून आणले. एवढेच नव्हे तर शेकापकडे असलेल्या ग्रामपंचायती शिवसेनेने घेतल्या. त्यामुळे जनतेचे पाठबळ शिवसेनेच्या बाजूनेच आहे. शिवसेना असो अथवा राष्ट्रवादी काँग्रेस यांनी समन्वयाची भूमिका घेतली नाही, तर येणाऱ्या ३२ ग्रामपंचायती, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका स्वबळावर लढवण्याबाबत निर्णय घ्यावा लागेल असा इशारा आमदार दळवी यांनी दिला. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्या मानसी दळवी, कामगार नेते दीपक रानवडे, अनंत गोंधळी, मनोज शिंदे, भरत बेलोसे, नीलेश घाटवळ, संजीवनी नाईक या वेळी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde group of shiv sena aggressive against bjp in raigad zws
Show comments