शिवसेना ( ठाकरे गट ) आणि शिंदे गटात सातत्याने आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. संजय शिरसाट यांनी ठाकरे गटासह खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. ठाकरे गट हा गद्दार आहे. हे शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले आहेत, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे. तसेच, संजय राऊत ही राजकारणाला लागलेली कीड आहे, अशा घणाघातही शिरसाट यांनी केला आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
“ठाकरे गट हा गद्दार आहे. त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचारांना तिलांजली देत मातीत गाडलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जायचं नव्हते, ते गेले. आम्ही कोणाच्या मांडीवर जाऊन बसलो नाही. हे शरद पवारांच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. ठाकरे गट ‘सिल्व्हर ओक’ला नतमस्तक झाला आहे,” असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.
हेही वाचा : “होय, ही घराणेशाहीच, मी शरद पवार अन्…”, विरोधकांच्या आरोपांना सुप्रिया सुळेंचं सडेतोड प्रत्युत्तर
“राऊत हे राजकारणाला लागलेली कीड”
“‘मातोश्री’वर अमित शाह, नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती पदाचे उमेदवार येत होते. ती ‘मातोश्री’ लोकांच्या दरवाजावर कटोर घेऊन जाते, याचं दु:ख आम्हाला होतं. याचा करता-करविता संजय राऊतांसारखे येडे लोक आहेत. राऊत हे राजकारणाला लागलेली कीड आहे. या किडीमुळे उद्धव ठाकरेंचं अध:पतन झालं आहे,” असेही शिरसाट म्हणाले.
“सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे…”
गृहमंत्री अमित शाह यांनीही शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली. “ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपाबरोबर निवडणूक लढवली होती, ते हिंदुत्व आता कुठं आहे. केवळ सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले,” असं अमित शाहांनी सांगितलं.
हेही वाचा : “ही भाकरी फिरवणे नव्हे, तर निव्वल धूळफेक”, फडणवीसांच्या टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…
“…यावर उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी”
“तीन तलाक, राम मंदिर, समान नागरी कायदा, मुस्लीम आरक्षण, वीर सावरकरांचा सन्मान करायचा की नाही, यावर उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी,” असं आव्हानही अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.