गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादचं नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्यावरून वाद चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. औरंगाबादचं नाव बदलण्याला एमआयएमनं विरोध केला असून खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात एमआयएमनं साखळी उपोषणही सुरू केलं आहे. या उपोषणाचीही शहरात बरीच चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. एकीकडे एमआयएम नामकरणाला विरोध करत असताना दुसरीकडे त्यावरून सत्ताधाऱ्यांकडून त्यावर टीका केली जात आहे. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा उपस्थित केला जात असताना त्यावरून आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी इम्तियाज जलील यांचं आंदोलन आणि एमआयएमवर टीका केली आहे.
“आम्ही तुमच्या मतांवर निवडून आलो का?”
छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात संजय शिरसाट यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी एमआयएमच्या आंदोलनावर तोंडसुख घेतलं. इम्तियाज जलील यांनी २०२४च्या निवडणुकीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर संजय शिरसाट यांनी टीका केली. “म्हणे आता बघू २४ च्या निवडणुकीत याचं काय करायचंय? अरे तुझ्या मतावर निवडून आलो का? तू स्वत:चं सांभाळ ना. ज्या औरंगजेबानं संभाजी महाराजांचा छळ केला, त्याचं नाव आम्हाला कसं आवडेल?” असं शिरसाट म्हणाले.
“अमेरिकेनं लादेनला मारलं. सगळ्या जगाला माहितीये कसं मारलं. त्यांनी हा विचार केला नाही की देशात काय होईल जगात काय होईल. त्यांनी चिंता केली नाही. लोखंडाची पेटी केली, त्याला सळ्या लावल्या. हेलिकॉप्टरने समुद्रात सोडून दिलं. आहे का त्या लादेनची कुठे कबर? झाला का त्यावरून देशात उठाव? कुणी बोललं का?” असा सवाल संजय शिरसाट यांनी केला.
बिर्याणी खाऊन उपोषण?
दरम्यान इम्तियाज जलील यांचं उपोषण बिर्याणी खाऊन चालू असल्याचं संजय शिरसाट म्हणाले. “तो सकाळी १२ वाजेपर्यंत उठत नाही. आम्ही सकाळी त्याच्याकडे गेलो उपोषणाच्या दिवशी. त्याच्या माणसाला विचारलं, साहब है क्या? तो म्हणे उपोषण को जाना है, साहब खाना खा रहे है. म्हटलं हे वेगळ्याच प्रकारचं उपोषण आहे. आम्ही पाहिलं तर ते तिथे बिर्याणी खात आहेत. हे जगातलं पहिलं बिर्याणीसहित उपोषण असेल”, असा टोला शिरसाट यांनी लगावला.
इम्तियाज जलील यांचं स्पष्टीकरण
दरम्यान, यासंदर्भात जलील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “हे साखळी उपोषण आहे. त्यामुळे जेवण करून उपोषण आंदोलन करण्यात काहीही चूक नाही. माझं मराठी थोडं कच्चं आहे. त्यामुळे कदाचित मी पहिल्या दिवशी उपोषण म्हणालो असेन”, असं इम्तियाज जलील यावर म्हणाले आहेत.