सत्ताधारी शिंदे गट आणि विरोधी पक्षात असणाऱ्या ठाकरे गटामध्ये गेल्या चार महिन्यांत तुफान कलगीतुरा पाहायला मिळाला आहे. हा कलगीतुरा अद्याप चालू असून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली जात नसल्याचं चित्र दिसत आहे. संजय राऊत आणि नारायण राणे यांच्यामध्ये झालेल्या आरोप प्रत्यारोपांवरून आता शिंदे गटाकडून खोचक शब्दांत टोला लगावण्यात आला आहे. मात्र, त्याचवेळी ठाकरे गटावर टीका करतानाच उद्धव ठाकरेंनाही सवाल करण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत विरुद्ध नारायण राणे

संजय राऊतांच्या टीकेला आज सकाळी माध्यमांशी बोलताना नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. राऊतांनी नारायण राणेंचा उल्लेख ‘पळपुटा’ असा केल्यानंतर राणेंनी त्यावरून टीका केली आहे. “संजय राऊत मला उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरेंबद्दल जे सांगायचे ते मी आता उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे. मी राऊतांनी सांगितलेली माहिती दिल्यावर उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी संजय राऊतांना चपलेने मारलं नाही, तर मला विचारा”, असं राणे म्हणाले.

दरम्यान, राणेंच्या या विधानावरून आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाला आणि संजय राऊतांना लक्ष्य केलं आहे. “जेव्हा शिदेंचा उठाव झाला, तेव्हा गुवाहाटीहून मी प्रतिक्रिया दिली होती की उद्धव ठाकरेंची दिशाभूल करणाऱ्या लोकांमुळेच शिवसेना आज संपतीये. तेच प्रकार आज चालू आहेत. काय चालू आहे, कोण बोलतंय, कुणाबद्दल बोलतंय. पक्षाचं कुणाला देणं-घेणं आहे की नाही. स्वत:ची टिमकी वाजवण्यासाठी पक्षाचा वापर आजही चालू आहे. हे लोक कोण आहेत. ग्राऊंड लेव्हलला यांनी काम केलंय का? ग्राऊंड लेव्हलची निवडणूक कशी लढतात हे यांना माहिती आहे का?” असं संजय शिरसाट म्हणाले.

“…तेव्हा उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे संजय राऊतांना चपलाने मारतील”, नारायण राणेंचा गंभीर आरोप

“…हे सगळं पक्षासाठी घातक आहे”

“यांच्या भूमिकेबाबत त्यांच्या पक्षातल्या उरल्या-सुरल्या आमदारांना विचारा तर खरं की ग्राऊंड लेव्हलला आपली काय परिस्थिती आहे. पण आपण कसं लाईमलाईटमध्ये येऊ, या पद्धतीने यांचं सगळं चाललंय. हे पक्षासाठी घातक आहे. पक्ष संपण्याच्या मार्गावर आहे. तरी उद्धव ठाकरे का गप्प आहेत, हे मला माहिती नाही”, अशा शब्दांत संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde group sanjay shirsat slams sanjay raut shivsena uddhav thackeray pmw