लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर : रक्तरंजित राजकारणामुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या बार्शी विधानसभेच्या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चलित शिवसेनेचे तालुकाप्रमुख भाऊसाहेब आंधळकर यांनी दावा जाहीर करीत भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. राऊत हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील आमदार म्हणून ओळखले जातात.

तत्कालीन शिवसेना आणि भाजपच्या युतीमध्ये बार्शी विधानसभेची जागा शिवसेनेकडे गेली आहे. मागील २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री दिलीप सोपल यांनी त्यावळे राजकीय वाऱ्यांची दिशा पाहून शिवसेनेत प्रवेश केला होता आणि बार्शी विधानसभा निवडणूक शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढविली होती. परंतु त्यावेळी भाजपच्या बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून लढलेले राजेंद्र राऊत हे सोपल यांचा पराभव करून निवडून आले होते. नंतर त्यांनी भाजपला समर्थन देत त्या पक्षाचे सहयोगी सदस्य होणे पसंत केले होते. राऊत हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मर्जीतील आमदार म्हणून ओळखले जातात.

आणखी वाचा-“शरद पवार म्हणाले तुम्ही आल्याशिवाय मी…”, जयंत पाटलांनी सांगितलं अजित पवारांच्या भेटीपूर्वी काय घडलं

आमदार राऊत यांची पार्श्वभूमी पाहता १९९० सालापासून ते शिवसेनेत होते. तत्कालीन राष्ट्रवादीचे दिलीप सोपल यांच्या विरोधात त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून सातत्याने आव्हान उभे केले होते. २००४ सालच्या विधानसभा निवडणुकीत ते प्रथमच सोपल यांच्यावर मात करून विधानसभेवर निवडून गेले होते. त्यावेळी शिवसैनिकांमध्ये ‘निघाला वाघ मुंबईला’ ही घोषणा गाजली होती. दरम्यान, तत्कालीन शिवसेना नेते नारायण राणे हे शिवसेनेतून फुटून काँग्रेसमध्ये दाखल झाले असता त्यांच्या सोबत आमदार राजेंद्र राऊत यांनीही शिवसेना सोडली होती. त्यानंतर पुढील २००९ सालच्या विधानसभा निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढविली असता त्यांचे प्रतिस्पर्धी दिलीप सोपल हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर मागील २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत राऊत यांनी अपक्ष म्हणून उतरत दुसऱ्यांदा आमदारकी मिळविली होती. सोपल-राऊत यांच्यातील राजकीय संघर्षात रक्तरंजित राजकारणही होत आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेत मोठी फूट पडून एकनाथ शिंदे यांनी आपल्या ४० आमदारांसह स्वतंत्र गट स्थापन करून भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रिपद मिळविल्यानंतर शिवसेनेने आपल्या पूर्वीच्या युतीअंतर्गत सुटलेल्या विधानसभेच्या जागांवर दावा सांगायला सुरूवात केली आहे. शिंदे चलित बार्शी तालुकाप्रमुख भाऊसाहेब आंधळकर आणि आमदार राजेंद्र राऊत यांच्यात विस्तवसुध्दा आडवे जात नाही. दोन्ही गटात नेहमीच रस्त्यावर भांडणतंटे होतात. माजी पोलीस अधिकारी असलेले आंधळकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत आमदार राजेंद्र राऊत यांच्या कथित अवैध मालमत्तेची चौकशी लावण्यास शासनाला भाग पाडले आहे. तर दुसरीकडे आमदार राऊत यांनीही आंधळकर यांच्या व्यवसायाची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणामार्फत होण्यासाठी भूमिका वठविली आहे. राऊत-आंधळकर यांच्या संघर्षात राऊत यांचे जुने पारंपारिक विरोधक दिलीप सोपल यांनी तटस्थतेची भूमिका घेतल्याचे दिसून येते.