अनेक नेते तसेच सेलिब्रिटींच्या घरी गणेश दर्शनसाठी जाणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी टीका केल्यानंतर शिंदे गटाने आक्रामक पवित्रा घेतला आहे. आपल्याला मुख्यमंत्री होता आलं नाही याची खंत अजित पवारांच्या मनात असून त्यामधूनच ते अशा पद्धतीची टीका करत असून श्रद्धचं राजाकारण करत असल्याचा टोला शिंदे गटाने लगावला आहे. अजित पवार यांनी, “भाईंना शो करायची सवय आहे. जसे काही पूर्वी काही शोमॅन होते. राज कपूर पूर्वी शो मॅन म्हणून ओळखले जायचे. तशाप्रकारची सवय त्यांना लागली आहे,” असा टोला मुख्यमंत्री शिंदेंना लगावला होता. त्यावरुनच शिंदे गटाने आता अजित पवारांना लक्ष्य केलं आहे.

नक्की वाचा >> अजित पवारांच्या ‘भाईंना शो करायची सवय’ टीकेवरुन मुख्यमंत्र्यांच्या खासदार पुत्राचं प्रत्युत्तर; म्हणाले, “दादा हा ‘शो’ नाही, पहाटेच्या…”

अजित पवार काय म्हणाले?
पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे यांना राजकीय वर्तुळामध्ये ज्या ‘भाई’ या नावाने ओळखलं जातं तोच उल्लेख करत अजित पवारांनी टोला लगावला. “आधीच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात गणपतीच्या दर्शनाला गेलेलं आठवत नाही. आम्ही अनेक ठिकाणी दर्शनाला जातो. पण आम्ही तुमच्यासारखे कॅमेरा घेऊन जात नाही,” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना आता मात्र चित्र बदलल्याचा संदर्भ अजित पवार यांनी दिला आहे. “पण आता कशी गाडी एन्ट्री करताना कॅमेरा लावला जातो. मग बरोबर गाडी थांबते, मग कोणतरी उतरतं. मग नमस्कार करतात. कशाला हे?” असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला.

“जो गणेशभक्त आहे. त्याने अशा पद्धतीने देखावा दाखवण्याचं कारण नाही. तुमच्या मनात ठेवा ना,” असा सल्ला अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिला. “भाईंना शो करायची सवय आहे. जसे काही पूर्वी काही शोमॅन होते. राज कपूर पूर्वी शो मॅन म्हणून ओळखले जायचे. तशाप्रकारची सवय त्यांना लागली आहे. आता त्याला काय करायचं? जनतेनेच बघावं आता काय चाललंय आणि काय नाही,” असंही विरोधी पक्षनेते असणाऱ्या अजित पवार यांनी म्हटलं आहे.

नक्की पाहा >> CM शिंदेंच्या निवासस्थानी फडणवीसांना मिळाला आरतीचा मान तर PM मोदींनी ‘या’ नेत्याच्या घरी केली गणपतीची आरती; पाहा Photos

शिंदे गटाने लगावला टोला
याचसंदर्भात भाष्य करताना शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी अजित पवारांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे मुख्यमंत्री होता आलं नाही असं म्हटलं आहे. “अजित पवार हे महाराष्ट्रातील फार मोठं नेतृत्व आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हावं हे त्यांचं स्वप्न होतं. त्यांच्या आयुष्यात एकदा ही संधी चालून आली होती. मात्र राष्ट्रवादीचे जास्त संख्येने आमदार असतानाही मोठ्या पवारसाहेबांनी ती संधी काँग्रेसला दिली. त्यानंतर त्यांनी एकदा पहाटे शपथविधी करुन उपमुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पवारसाहेबांनी त्यांचा डाव उलटवून लावला. त्यामुळे मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता आलं नाही याची खंत त्यांच्या मनात आहे असं वाटतं,” असं म्हस्के यांनी ठाण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं आहे.

“एका सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला ही सल त्यांना बोचत असावी. शिंदे मागील अनेक वर्षांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरी गणपती दर्शनाला जातात. त्यामुळेच त्यांनी (अजित पवारांनी) श्रद्धेचं राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच हेतूने त्यांनी टीका केली,” असा आरोप म्हस्के यांनी अजित पवारांना लक्ष्य करताना केला. तसेच, “त्यांना सांगावसं वाटतंय की शिंदेसाहेबांचे हात अजूनही आभाळाला टेकलेले नाहीत. त्यांचे पाय जमिनीवर आहेत. हे त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येतं,” असंही म्हस्के म्हणाले.

“मी मुख्यमंत्र्यांविरोधात बोललो नाही तर माझं विरोधीपक्ष नेतेपद मोठे पवारसाहेब काढून घेतील ही भीती असावी म्हणून सुद्धा ते मुख्यमंत्र्यांवर टीका करत असावेत,” असा टोला अजित पवारांना लागवला आहे. “आता जी मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यासाठी दादा आणि ताईंची (सुप्रिया सुळेंची) जी चढाओढ सुरु आहे ती पाहून मला एकच संवाद आठवतो तो म्हणजे, दया कुछ तो गडबड हैं,” असा चिमटाही म्हस्के यांनी काढला आहे.

Story img Loader