मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्षात अंतर्गत कलह सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. त्यामुळे मूळ शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा? याबाबत शिवसैनिकांसह सामान्य जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. एकंदरीत अशी स्थिती असताना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांनी मोठं विधान केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निवडणूक आयोग जे चिन्ह देईल, ते घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ, असं विधान केसरकर यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

माध्यमांशी संवाद साधताना केसरकर म्हणाले, “आम्ही पुढच्या निवडणुकीमध्ये युती म्हणूनच लोकांच्या समोर जाणार आहोत. मतदान तोंडावर आलं आहे. त्यामुळे आमची युती पसंत आहे की तुमची आघाडी पसंत आहे, याचा निर्णय लोकं घेतील. जनतेला सामोरं जाण्याची आमची तयारी आहे. निवडणूक आयोग आम्हाला जे काही चिन्ह देईल, ते घेऊन आम्ही युती म्हणून लोकांच्या समोर जाणार आहोत,” असं विधान केसरकर यांनी केलं आहे.

हेही वाचा- “…नाहीतर जीवच गेला असता” चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांची टोलेबाजी!

दरम्यान, आज सकाळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना बंडखोर आमदार गुलाबराव पाटील म्हणाले की, “न्यायालयाच्या लढाईत आम्हाला फारसं बोलता येणार नाही. पण अशा स्थितीत कोणत्याही ठिकाणी सामान्यत: डोकी मोजली जातात आणि डोक्यांनाच महत्त्व असतं. तसेच आम्ही अद्याप शिवसेना पक्ष सोडला नाही. त्यामुळे असा संभ्रम कुणी तयार करत असेल तर तो करू नये. आम्ही पार्टी सोडलेली नाही. आम्ही पार्टीच्या अंतर्गत हा उठाव केलेला आहे.”

हेही वाचा- ईडीच्या अगाध लीला; अर्जुन खोतकर यांची रावसाहेब दानवे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दिलजमाई

“पक्ष सोडला असता तर धनुष्यबाण कोणाचा? असे प्रश्न पडले असते. मात्र, शिवसेना पक्षानं नैसर्गिक युती करावी, अशी मागणी आम्ही शिवसेना पक्षप्रमुखांकडे केली होती. बहुतांशी आमदारांनी हीच मागणी केली होती. पण ही मागणी न ऐकल्यामुळे आम्हाला हा उठाव करावा लागला. आम्ही शिवसेना पक्ष सोडलेला नाही, त्यामुळे धनुष्यबाण हा आमचाच राहणार आहे” असं मोठं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde group spokeperson deepak kesarkar big statement about dhanushyaban rmm
Show comments