एकनाथ शिंदे यांच्या गटाने निवडणूक चिन्हांसंदर्भात दोन स्वतंत्र ई-मेल निवडणूक आयोगाला पाठवले आहेत. दोन्ही ई-मेलमध्ये प्रत्येक तीन नवीन चिन्हांचा पर्याय सूचवल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये ढाल-तलवार, तळपता सूर्य आणि पिंपळाचं झाड, रिक्षा, शंख आणि तुतारी असे पर्याय देण्यात आले आहेत. या चिन्हांबाबत निवडणूक आयोगाकडून विचार सुरू असून कोणत्याही क्षणी शिंदे गटाला निवडणूक चिन्ह जाहीर केलं जाऊ शकतं.

ही चिन्हे निवडणूक आयोगाकडे सादर केल्यानंतर शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या चिन्हांचा अर्थही त्यांनी सांगितला आहे. ढाल-तलवार, तळपता सूर्य, पिंपळाचं झाड, रिक्षा, शंख आणि तुतारी हे सहा पर्याय निवडणूक आयोगाकडे दिले आहेत. यातील जे चिन्ह मिळेल ते आम्ही स्वीकारायला तयार आहोत, असंही गोगावले म्हणाले.

हेही वाचा- “हा चोरबाजार सुरू आहे…” निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अरविंद सावंतांची प्रतिक्रिया, म्हणाले…

संबंधित चिन्हांचा अर्थ सांगताना भरत गोगावले म्हणाले की, जनतेचं रक्षण करण्यासाठी ढाल आहे, तर शत्रू अंगावर आला तर त्यांच्यासाठी तलवार आहे. ‘सूर्य’ उगवल्याशिवाय आपला दिवस चांगला जाऊ शकत नाही, त्यासाठी ‘तळपता सूर्य’ हे चिन्ह सादर केलं आहे. तर ‘पिंपळ’ हे पवित्र झाड आहे. त्यामुळे आम्हाला काळजी करायचं काहीही कारण नाही. आम्हाला जे चिन्ह मिळेल ते घ्यायला आम्ही तयार आहोत, अशी प्रतिक्रिया भगत गोगावले यांनी दिली आहे.

हेही वाचा- “त्यांचे बाळासाहेब कोणते?” शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव मिळाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा टोला!

आता ठाकरे गटाकडून सर्वत्र मशाली दाखवल्या जात आहेत. पण आमचा सूर्य तळपळा तर त्या मशालींचा किती उजेड पडणार आहे, ते आम्ही बघू, असंही गोगावले यावेळी म्हणाले. ते ‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीशी फोनवरून संवाद साधत होते.