राजगोपाल मयेकर
दापोली : दापोली मतदारसंघात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपच्या इच्छुकांची स्थानिक पक्षश्रेष्ठींकडे वर्दळ वाढू लागली आहे. यामध्ये बंडखोर शिवसेना आमदार योगेश कदम यांच्या समर्थकांना पक्षाचे निवडणूक चिन्ह वापरण्यास मज्जाव झाल्यास ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत.
राज्यातील सत्तेप्रमाणे दापोली मतदारसंघात त्यांची भाजपशी युती होणार का, याबाबत मात्र साशंकता व्यक्त होत आहे. योगेश कदम यांचा मागील नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडी करण्यास विरोध होता. पण पालकमंत्री अनिल परब यांनी पक्षाची सर्व सूत्रे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे तडकाफडकी सोपवत राष्ट्रवादीशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शिवसेनेतील दळवी समर्थक नेते व त्यांचे पारंपरिक शत्रू असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकत्र व्यासपीठावर येऊ लागले. योगेश कदम यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी या आघाडीला विरोध करत नगरपंचायत निवडणुकीत सर्वप्रथम बंडाचा झेंडा फडकावला. या वेळी बलाढय़ राष्ट्रवादी शिवसेनेची आघाडी होऊनही या बंडखोरांनी शिवसेनेच्या दळवी समर्थक उमेदवारांना कडवे आव्हान दिले. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील याच आघाडीवरून उद्भवलेल्या शिवसेनेतील बंडात सहभागी होत आमदार योगेश कदम यांनी आपली तीच भूमिका स्पष्ट केली. मतदारसंघातील शिवसेनेचे प्राबल्य संपविण्याचे अनिल परब यांचे धोरण आहे, अशी टीका करत कदम यांनी आघाडीबाबत असंतोष व्यक्त केला. आता भाजपच्या साथीने बंडखोर आमदारांची सत्ता स्थापन झाल्याने कदम आपल्या रणनीतीमध्ये यशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. दापोलीत परतल्यानंतर त्यांनी आपण प्रसंगी अपक्ष म्हणून निवडणूक लढवू, पण राष्ट्रवादीशी आघाडी करून शिवसेनेला संपविण्याचा घाट कधीही यशस्वी होऊ देणार नाही,ह्ण असे जाहीर केले. साहजिकच त्यांच्या समर्थकांना शिवसेनेचे निवडणूक चिन्ह मिळाले नाही तर ते नगरपंचायत निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरतील आणि योगेश कदम आमदार म्हणून त्यांचा उघड प्रचार करतील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपची साथ घेणारे योगेश कदम दापोली मतदारसंघात भाजपशी युतीबाबत मात्र अजूनही गप्प आहेत. त्यामुळे ही युती होणार की योगेश कदम समर्थक स्वतंत्रपणे राष्ट्रवादी- शिवसेना आघाडीचा मुकाबला करणार, याकडे सर्वाचे लक्ष आहे. यापूर्वी दापोली मतदारसंघात आमदार योगेश कदम यांना भाजपपेक्षा काँग्रेस जवळची होती. याचा दाखला नगरपंचायत निवडणुकीतील समझोत्याच्या वेळीच त्यांनी दिला होता. मात्र संपूर्ण मतदारसंघासाठी ती रणनीती कायम राहण्याची शक्यता कमी असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.