Shinde Shivsena Minister Sanjay Shirsat Reaction on Uddhav Thackeray Meets CM Devendra Fadnavis : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा मुंबईत शपथविधी पार पडला. फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरेंनाही या शपथविधीचं निमंत्रण दिलं होतं. मात्र उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षातील कोणताही नेता या शपथविधीला हजर राहिला नाही. मात्र, आता उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या विधीमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी अनिल परब, आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई, भास्कर जाधव व सचिन अहिर यांच्यासह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीवरून आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र ही सदिच्छा भेट असल्याचे दोन्ही पक्षातील नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, या भेटीवर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मंत्री तथा शिवसेनेचे (शिंदे) नेते संजय शिरसाट म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले यात काहीच गैर नाही. असा समंजसपणा राजकारणी लोकांनी दाखवायला हवा. उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या काळात जे काही टोमणे मारले, खालच्या पातळीवर बोलले, टीका केली हे जे काही केलं होतं, तो राजकीय भाग सोडून आज ते फडणवीस यांना भेटायला गेले याचा आनंद आहे. त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली काय नाही हा वेगळा भाग आहे. परंतु, हा समंजसपणा त्यांनी पूर्वी दाखवला असता तर आज वेगळं राजकीय चित्र दिसलं असतं. जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. परंतु, त्यांना ही जाणीव आधीच व्हायला हवी होती. राजकारणात सर्वांना बरोबर घेऊन राहावं लागतं हे त्यांना समजलं हे देखील काही कमी नाही.

हे ही वाचा >> “मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का?” भुजबळांचा प्रफुल्ल पटेलांवर संताप; राष्ट्रवादीत जुंपली

भेटीचं कारण काय?

“राज्य अशांत आहे. परभणी, बीडमधील हत्या प्रकरणांमुळे राज्य अस्थिर झालंय. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर सरकारने ठोस पावलं उचलावी”, अशी मागणी करण्यासाठी उद्धव ठाकरे फडणवीसांना भेटले असतील, असं शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे हे भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांना भेटले नाहीत, तर राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे प्रमुख असलेल्या फडणवीसांची भेट घेतली आहे. फडणवीसांकडे राज्याचे, एका संस्थेचे प्रमुख म्हणून पाहावं.

हे ही वाचा >> “…तेव्हा यांनी कच खाल्ली”, भुजबळांचा राष्ट्रवादीपाठोपाठ महायुतीला टोला; लोकसभेतली खदखद अखेर बाहेर पडली

ठाकरे-फडणवीस भेटीवर भाजपाची प्रतिक्रिया

“उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा देण्यासाठी फडणवीसांच्या भेट घेतली असेल”, असं भाजपा नेते प्रसाद लाड म्हणाले.तर, “विरोधी पक्षातील लोक अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना भेटत असतात. या भेटीचे वेगळे अर्थ काढू नये, असं भाजपा आमदार प्रवीण दरेकर म्हणाले. माझी आणि उद्धव ठाकरे यांची देखील मघाशी भेट झाली. ही आपली राजकीय संस्कृती आहे. आम्ही विरोधक आहोत वैरी नाही. आमचे राजकारणाबाहेर जिव्हाळ्याचे संबंध आहेत”, असंही दरेकर यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde shivsena sanjay shirsat reacts on uddhav thackeray devendra fadnavis meeting asc