अंधेरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवण्याचा निर्णय शनिवारी सायंकाळी जाहीर केला. या निर्णयानुसार अंधेरीतील पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला नुसतं शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही. या निर्णयानंतर सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपा विरुद्ध महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. असं असतानाच दुसरीकडे हा चिन्ह आणि नाव गोठवण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय नेमका कधीपर्यंत लागू असेल? ठाकरे गटाला पक्षाचं नाव आणि चिन्ह पुन्हा मिळेल का? यासारख्या प्रश्नासंदर्भात संभ्रम जनतेच्या मनात आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये चर्चेत असणाऱ्या या प्रश्नांना ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उत्तरं दिली आहेत.

नक्की वाचा >> “शिंदेच अपात्र ठरले तर…”; निवडणूक आयोगाच्या नाव, चिन्हं गोठवण्याच्या निर्णयाचा सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर परिणाम होणार?

एका खासगी वृत्तवाहिनीला रविवारी सायंकाळी दिलेल्या मुलाखतीमध्ये बापट यांनी निवडणूक चिन्ह आणि नाव गोठवण्यासंदर्भातील निर्णयाच्या कायदेशीर बाबींचं विवेचन केलं. “नाव आणि चिन्ह गोठवलं आहे हे तात्पुरत्या स्वरुपात गोठवलं आहे तर पुन्हा शिवसेनेला ते नाव आणि चिन्हं मिळू शकतं का?” असा प्रश्न या मुलाखतीमध्ये बापट यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना बापट यांनी, “हा प्रश्न मला अनेक वृत्तवाहिन्या आणि विद्यार्थी विचारत आहेत. हा तात्पुरता निर्णय आहे. जोपर्यंत शिवसेना कोणाची याचा अंतिम निर्णय निवडणूक आयोग देत नाही तोपर्यंत हा निर्णय लागू राहील. ही चिन्हं आताच्या निवडणुकीत पण राहतील. त्यानंतर होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पण राहतील. थोडक्यात काय तर निवडणूक आयोगाचा अंतिम निर्णय येईपर्यंत हा निर्णय लागू राहील,” अशी माहिती दिली.

नक्की वाचा >> उद्धव विरुद्ध शिंदे वादात राज ठाकरे ट्रोल! रात्री आठनंतर ‘गुड मॉर्निंग’ अन् देशपांडे, काळे, शालिनीताईंना आवरण्याचा सल्ला

याच उत्तरावरुन ‘टीव्ही ९ मराठी’वरील या मुलाखतीमध्ये बापट यांना निवडणूक आयोगाचा अंतिम निर्णय नेमका कधी येणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बापट यांनी कालावधी नेमका सांगता येणार नाही असं म्हणत याबद्दल अनिश्चितता असल्याचं नमूद केलं. “अंतिम निर्णय नेमका कधी येणार हे काही सांगता येणार नाही. न्यायालयामध्ये काय किंवा निवडणूक आयोगासमोर काय उशीरा दिलेला न्याय हा न्याय नाकारण्यासारखं आहे. आम्ही तसं विद्यार्थ्यांना शिकवतो. मात्र प्रत्यक्षात भारतात हे दररोज घडतं,” असं उत्तर बापट यांनी दिलं.

नक्की वाचा >> आता ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ नावावरुन शिंदे आणि ठाकरेंमध्ये वादाची शक्यता; मात्र हे नाव ठाकरेंना मिळण्याची शक्यता अधिक कारण…

तसेच ज्या पद्धतीने घटनाक्रम घडला आहे तो लक्षात घेऊन एक एका प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने देणं अपेक्षित असल्याचं मत बापट यांनी व्यक्त केलं. १६ आमदार अपात्र आहेत की नाही हा सर्वात महत्तवाचा मुद्दा असून त्यावरच पुढील सर्व राजकीय घडामोडी अवलंबून असल्याचं बापट यांनी सांगितलं. जर ते १६ आमदारच अपात्र ठरले तर त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही अपात्र ठरतील, अशी शक्यता बापट यांनी व्यक्त केली.

Story img Loader