केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गेल्या ४० वर्षांत सोलापुरात विकासाची गंगा आणली आहे. या विकासकामांच्या बळावरच आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे हे पुन्हा विरोधकांचे पानिपत करून हमखास निवडून येतील, असा ठाम विश्वास आमदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला. शिंदे यांच्या विरोधात विरोधक कोणी का असेना, तो काँग्रेसच्या दृष्टीने बेदखल असल्याचा दावाही त्यांनी केला.
सोलापूर लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचाराचे नियोजन करण्याच्या पाश्र्वभूमीवर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शिवछत्रपती रंगभवनात काँग्रेस कार्यकर्त्यांचे शिबिर पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर नेत्यांची गर्दी एवढी वाढली होती की, सुरुवातीला अभिवादन केलेल्या महात्मा गांधीजींचा पुतळा नंतर अन्यत्र हलवून नेत्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली गेली.
लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडे सांगण्यासारखे मुद्दे नसल्यामुळे काँग्रेसच्या विरोधात अप्रचार केला जात असून पक्ष कार्यकर्त्यांनी त्याबाबत सावध राहण्याची भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत मांडताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, सदैव दुष्काळाच्या छायेत असलेल्या सोलापूर जिल्ह्य़ासाठी उजनी धरण उभारताना सुशीलकुमार शिंदे यांनी राज्याचे अर्थमंत्री असताना वेळोवेळी भरीव निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे उजनी धरण पूर्ण होऊन बहुतांश भागातील तहान भागविली गेली. केवळ मतदार जनतेने ताकद दिल्यामुळे शिंदे यांना अशी विकासकामे करता आली. सोलापूरकरांची तहान भागविण्यासाठी उजनी धरण ते थेट सोलापूर जलवाहिनी तसेच एनटीपीसी प्रकल्पासह सोलापूर-पुणे महामार्गाचे चौपदरीकरण, पुणे-सोलापूर-गुंटकल रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण, बोरामणीचा विमानतळ यांसह विविध विकासकामे दृष्टिपथास येत असताना या कामांची पावती सोलापूरचे मतदार देतील, असा विश्वास आमदार शिंदे यांनी व्यक्त केला.
नुकत्याच झालेल्या गारपीट व वादळी वा-यांसह पडलेल्या अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या सामान्य गोरगरीब व शेतकरी जनतेला मदत करून दिलासा देण्यासाठी काँग्रेस आघाडीचे शासन कटिबध्द आहे. काँग्रेसनेही पक्षीय पातळीवर मदतीचा हातभार दिला. त्यावेळी विरोधक कोठेही दिसले नाहीत, अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडले. शिंदे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी विकास कामांची माहिती घरोघरी पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले. पक्षाचे शहराध्यक्ष धर्मा भोसले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी महापौर अलका राठोड (युवक व महिला सक्षमीकरण), माजी आमदार प्रकाश यलगुलवार (काँग्रेसची भूमिका), विश्वनाथ चाकोते (सहकार क्षेत्रात काँग्रेसचे कार्य), महापालिका सभागृह नेते महेश कोठे (शहर विकासाची कामे), सुधीर खरटमल (कार्यकर्त्यांची आचारसंहिता व शिस्तपालन), अ‍ॅड. यू. एन. बेरिया (अल्पसंख्याक व मागासवर्गीयांविषयी काँग्रेसची धोरणे) व मनीष गडदे (प्रसार माध्यमे व आचारसंहिता) आदींनी मार्गदर्शन केले. शिबिराचे सूत्रसंचालन हाजीमलंग नदाफ यांनी केले.
 

Story img Loader