नाशिक येथे सन २०१५ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळय़ास लाखो भाविक येणार असून, त्यातील ६० टक्के भाविक शिर्डी येथे दर्शनासाठी येतील. त्याचा पडणारा ताण लक्षात घेऊन शिर्डी परिसरातील पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारने पाचशे कोटी रुपये उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे करणार असल्याची माहिती कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.
सिंहस्थ कुंभमेळय़ाच्या पाश्र्वभूमीवर शिर्डी आणि परिसरातील गावांचा विकास व्हावा, यासाठी राज्य सरकारकडे विविध प्रस्ताव दाखल करण्यात येणार आहेत. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, संरक्षण, परिवहन आदी विभागांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रस्ताव शासनाकडे सादर करायचे आहेत. याबाबतची बैठक विखे यांच्या उपस्थितीत झाली. प्रांताधिकारी अजय मोरे, सिंहस्थ कुंभमेळा समितीचे प्रमुख आणि नाशिक महापालिकेचे उपायुक्त प्रदीप कासार, तहसीलदार अप्पासाहेब िशदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
सुरुवातीला कासार यांनी २००३ मध्ये झालेल्या कुंभमेळय़ाचा आधार घेऊन पायाभूत सुविधांसाठी कशाप्रकारे प्रस्ताव दाखल करायचे याची माहिती दिली. त्यानुसार प्रत्येक विभागाचा स्वतंत्र प्रस्ताव दाखल झाल्यास आपत्कालीन व्यवस्थापनांतर्गत वेगळा निधी प्राप्त होऊ शकतो. ग्रामीण विकासासाठी नियोजन आयोगाच्या माध्यमातूनही निधी उपलब्ध होईल. २०१५मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळय़ासाठी २ हजार ४०० कोटी रुपयांचा आराखडा राज्य सरकारला सादर करण्यात आला असल्याचे कासार यांनी सांगितले.
विखे म्हणाले, मागील सिंहस्थ कुंभमेळय़ाचा अनुभव लक्षात घेता नाशिक येथे येणारे भाविक हे प्राधान्याने शिर्डीला येतील. भाविकांची ही गर्दी लक्षात घेता पायाभूत सुविधांची मोठी गरज आहे. त्यादृष्टीने विविध विभागांचे प्रस्ताव सादर झाल्यास शिर्डी आणि परिसरातील गावांसाठी मोठा निधी प्राप्त करून घेता येईल. प्राथमिक आरोग्य केंद्र, रस्ते, वीज, तसेच जलसंपदा आणि सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टीने विविध योजना उपलब्ध करून घेण्यासाठी हे प्रस्ताव तातडीने दाखल करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. प्रांताधिकारी मोरे यांच्या मार्गदर्शनखालील समन्वय समिती हे प्रस्ताव सादर करील असा निर्णयही बैठकीत झाला.

Story img Loader