राहाता : शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांवर लुटीच्या उद्देशाने मोटारसायकलवरून आलेल्या अनोळखी तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला करीत त्यांची निर्घृण हत्या केली. तर आणखी एका वयोवृद्धावर असाच हल्ला झाल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी पहाटेच्या सुमारास या दोन्ही घटना घडल्या. याप्रकरणी शिर्डी व राहाता पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुभाष घोडे व नितीन शेजूळ (दोघेही रा. शिर्डी) अशी मृत तरुणांची नावे आहेत. कृष्णा देहरकर असे गंभीर जखमी वृद्धाचे नाव आहे. सुभाष व नितीन पहाटे साई संस्थानमध्ये कामावर जात असताना त्यांची दुचाकी अनोळखी तरुणांनी अडवून त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले. वेळेवर मदत न मिळाल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याचे समजते. तर कृष्णा देहरकर हे वयोवृद्ध आपल्या मुलाला शिर्डीतील बस स्थानकावर पोहचवून परतताना शिर्डी-साकुरी शिवारात त्याच अनोळखींनी धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मोटारसायकलवरील तरुणांनी चोरीच्या उद्देशाने या तिघांना वेगवेगळ्या वेळेत अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी किरण सदाफुले याला संशयावरून ताब्यात घेतले आहे तर राजू माळी हा दुसरा संशयित तरुण आहे. पोलिसांनी विविध पथक तैनात करून त्याचा शोध सुरू केला आहे.

शिर्डीमधील या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत. येथे बाहेरचे गुन्हेगार येऊन अशा घटना करतात. शिर्डीची गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येतील. – डॉ. सुजय विखे, माजी खासदार

साकुरी-राहाता रस्त्यावर अनोळखी व्यक्तींनी लुटमार करण्याच्या उद्देशाने धारदार हत्याराने दोघांची हत्या केली. याबाबत गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. – प्रदीप देशमुख, प्रभारी पोलीस निरीक्षक, राहाता