राहाता : भाविकांची प्रचंड गर्दी आणि दातृत्वामुळे साईबाबांची शिर्डी नेहमीच चर्चेत राहते. पण गेल्या काही वर्षांत शिर्डीला राजकीय ओळख लाभू लागली आहे. आधी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस, मग काँग्रेस, त्यानंतर शरद पवार गट आणि आता भाजप. राजकीय पक्षांच्या अधिवेशनाचे शिर्डी हमखास स्थळ ठरू लागले आहे. साईंच्या सान्निध्यात अधिवेशन जुळवून आणण्यामागे भक्तिभाव आहे, योगायोग की व्यवस्थापकीय सुलभता याविषयी शिर्डीवासीयांत उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपचे एकदिवसीय अधिवेशन रविवारी शिर्डीत होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे त्याला उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने अहिल्यानगर जिल्हा व शिर्डीत भाजपच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. अधिवेशनाची जोरदार तयारी सध्या करण्यात येत आहे, मात्र या अधिवेशनाच्या निमित्ताने राजकीय पक्षांच्या शिर्डी‘वारी’बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या दोन-तीन वर्षांत प्रमुख राजकीय पक्षांनी शिर्डीला अधिवेशन, शिबीर, अभ्यास मेळाव्याचे ठिकाण म्हणून निवडले आहे. २०२२मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित असताना शिर्डीत अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्याच अधिवेशनातून अजित पवार निघून गेल्याची चर्चा अधिक झाली होती. राष्ट्रवादीच्या फुटीची सुरुवात शिर्डीपासूनच झाल्याचे मानले जाते. काँग्रेस पक्षाचे चिंतन शिबीर जून २०२२ मध्ये शिर्डीत झाले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाचे दोनदिवसीय अधिवेशन शिर्डीत झाले होते. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाला यश मिळाले होते. आता विधानसभा निवडणुकीतील यशानंतर आगामी महानगरपालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपने शिर्डीची निवड केली आहे.

हेही वाचा >>>वीजदरवाढ तूर्तास टळली, ‘डीसल्फरायझेशन’ची सक्ती दोन वर्षे लांबणीवर गेल्याने दिलासा

शतप्रतिशतचा संकल्प?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी सायंकाळी शिर्डीत दाखल होणार आहेत. शनिवारी रात्री भाजपच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे. रविवारच्या अधिवेशनातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता आहे. भाजपची राज्यभर ताकद वाढल्यामुळे या निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा अधिवेशनात देण्यात येऊ शकतो. त्याविषयीही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून भूमिका स्पष्ट करण्यात येऊ शकते.

विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या. या पार्श्वभूमीवर होत असलेले भाजपचे राज्यस्तरीय अधिवेशन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला निश्चितच दिशा देणारे ठरणार आहे. हे अधिवेशन ह्यन भूतो न भविष्यतिह्ण पद्धतीने आम्ही यशस्वी करू. – राधाकृष्ण विखे, भाजपचे ज्येष्ठ नेते

शहराचे महत्त्व

शिर्डीसाठी रेल्वे, विमान व बससेवा उपलब्ध आहे. याशिवाय शिर्डी व आसपासच्या परिसरात हॉटेल्स मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे कितीही कार्यकर्ते आले तरी त्यांच्या निवासाची व्यवस्था करता येते. याशिवाय भक्तनिवासाचा उपयोग होतो.

भाजपच्या शिबिराची सारी जबाबदारी ही जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे आहे. काँग्रेसच्या अधिवेशनाची जबाबदारी ही माजी मंत्री बाळासाहेब थोरातांवर होती.

विखे-पाटील, थोरात असे वजनदार नेते शिर्डीतील असल्याने पक्षांची सारी व्यवस्थाही होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shirdi political party convention venues coincidence discussion amy