सरत्या वर्षांला निरोप व नवीन वर्षांच्या स्वागतासाठी शिर्डी सज्ज झाली आहे. साईबाबा संस्थाननेही संभाव्य गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त निवास व प्रसाद भोजन व्यवस्थेची तयारी केली. दि. ३१ला भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नाताळची सुट्टी, वर्षांअखेर व नवीन वर्षांचा प्रारंभ साईंच्या दर्शनाने व्हावा यासाठी लाखो साईभक्त शिर्डीत येतात. येणाऱ्या भक्तांची योग्य प्रकारे निवासी व्यवस्था होण्यासाठी संस्थानने ठिकठिकाणी शामियाना मंडपाची उभारणी केली. त्यामध्ये बिछायत व्यवस्था केली आहे. साईनगर मैदान, नवीन भक्त निवास वाहनतळ, साईभक्त निवास वाहनतळ आदी ठिकाणी सुमारे ७१ हजार चौरस फूट क्षेत्रफळाचा शामियाना मंडप, बिछायत व कनातीसह उभारण्यात आला आहे. त्यात अतिरिक्त निवास व्यवस्था करण्यात आली आहे. नवीन भक्त निवासाच्या शेजारील वाहनतळामध्ये करण्यात येणाऱ्या अतिरिक्त निवासाच्या ठिकाणी स्वयंसेवी प्रसाद भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. शिर्डीतून होणारी अवजड वाहनांची वाहतूक कोल्हार-पुणतांबा चौफुली यामार्गे वळविण्यात आली आहे.
दि. ३१ ला साईबाबांचे समाधी मंदिर भक्तांना दर्शन घेण्यासाठी रात्रभर उघडे राहणार असल्याने त्या दिवशी शेजारती व  दि. १ जानेवारीला पहाटेची काकड आरती होणार नाही. दि. ३१ ला रात्री ७ ते ९.३० यावेळेत पारस जैन व प्रविण महामुनी यांचा साईभजन संध्याचा कार्यक्रम, रात्री ९.३० ते १२ यावेळेत सच्चिदानंद आप्पा यांचा ‘एक शाम साई के नाम’ हा हिंदूी-मराठी भक्तीसंगीताचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. सर्व भाविकांना प्रसाद लाडूचा लाभ मिळावा यासाठी दि. ३१ ला रात्रभर लाडू विक्रीही सुरु ठेवण्यात येणार आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांसह संस्थानच्या सुरक्षा विभागाला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहे. गर्दीच्या काळात बेवारस वस्तूंना लोकांनी हाताळू नये, असे आवाहन सुरक्षा विभागाने केले आहे. सरत्या वर्षांला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षांच्या स्वागतासाठी शिर्डीत येणाऱ्या भक्तांसाठी हॉटेल व्यावसायिकांनीही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. संभाव्य गर्दीमुळे दि. ३१ व दि. १ जानेवारीला जनसंपर्क कार्यालयातून देण्यात येणारे व्हीआयपी दर्शन पास बंद ठेवण्यात येणार आहेत.