राहाता : जागतिक कीर्तीचे देवस्थान असलेल्या शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा मोठा निर्णय साई संस्थानने आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर घेतला आहे. त्यासाठी साईभक्तांनी दर्शनाला येण्याआगोदर साई संस्थानच्या अधिकृत वेबसाईटवर आपली नोंदणी करणे बंधनकारक आहे.

घरातून निघाल्यानंतर साई मंदिरात दर्शन करेपर्यंत काही अप्रिय घटना घडली तर पाच लाखांपर्यंतचे विमा कवच संबंधिताला किंवा त्याच्या कुटुंबियांना मिळणार आहे. विम्याचा कालावधी एक वर्षी साठी असणार आहे. परंतु प्रत्येक भाविकांना दरवेळेस शिर्डीत येतांना वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक राहाणारा आहे. अशी माहिती साईबाबा संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना अपघात होण्याच्या घटना अनेकदा होतात. यामध्ये अनेकांचा जीव जातो. पदयात्री भाविकांचा अपघातात मृत्यू होतो तसेच संस्थानच्या वतीने आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा, रामनवमी या उत्सवांना तसेच नवीन वर्षांच्या स्वागतासाठी राज्य व परराज्यातील अनेक साईभक्त पायी चालत शिर्डीला येत असता त्यामुळे भक्तांची सुरक्षा लक्षात घेऊन साईबाबा संस्थानने भक्तांसाठी पाच लाखांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एका कंपनीशी करार केला असून त्यासाठी लागणारा हप्ताही कंपनीकडे जमा करण्यात आल्याचे गाडीलकर यांनी सांगितले. शिर्डीला येणाऱ्या भाविकांनी संस्थानच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. देश-विदेशातील सर्व भक्तांसाठी ही योजना लागू आहे. घरातून निघताना भाविकांनी संस्थानच्या संकेतस्थळावर नोंदणी करायची. वाटेत अपघात अगर अन्य दुर्घटना घडली, तर पाच लाखापर्यंतच्या विम्याची नुकसानभरापाई अपगातग्रस्त साईभक्ताला किंवा त्याच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे.

साईसंस्थानच्या संकेतस्थळावर नोंदणी करून निघालेल्या भक्तांनाच या योजनेचा लाभ होणार आहे. त्यांची नोंदणी हाच ते शिर्डीला साईदर्शनासाठी येत असल्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे शिर्डीला येताना सर्व भाविकांनी नोंदणी करावी, असे आवाहन संस्थानतर्फे करण्यात आले आहे. हा निर्णय साईभक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे. विशेषतः दूरवरून येणाऱ्या भाविकांसाठी हे विमा कवच मोठा आधार ठरणार आहे. वार्षिक उत्सव किंवा गर्दीच्या काळातही या निर्णयामुळे भक्तांचे संरक्षण मिळणार आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना काही अडचण आली, तर या माध्यमातून त्यांना आर्थिक मदतीचा मोठा आधार मिळणार आहे. याचा कोणताही भार साईभक्तांवर टाकण्यात येणार नाही. विमा हप्ता साईबाबा संस्थानमार्फत भरला जाणार आहे.’

भक्तांनी वेबसाईटवर नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच पायी दिंडी सोहळा घेऊन येणार्या दिंडी प्रमुखांनी पदयात्रींचे आधारकार्ड, मोबाईल क्रमांक यांची माहिती संस्थानकडे देणे आवश्यक आहे. साईभक्तांनी वेबसाईटवर नोंदणी म्हणजे दर्शनपास, भक्तनिवास मधील खोल्या, आरती बुकिंग, सत्यनारायण पूजा असे बुकिंग करणे अपेक्षित आहे. या योजनेचा गैरवापर होऊ नये म्हणून संबंधित भाविक शिर्डीला साईबाबांच्या दर्शनालाच येत होते का? याचा पुरावा म्हणून ही नोंदणी आवश्यक आहे. भाविकाने नोंदणी करून तो घरातून निघाल्यापासून शिर्डीला येईपर्यंत त्याला हे विमा कवच लागू राहणार आहे. त्यासाठी कोणत्याही भौगोलिक सीमेचे बंधन नसल्याचे गाडीलकर यांनी सांगितले.