Shirdi Trust Decision on Mahaprasad: शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दररोज हजारोंच्या संख्येनं भाविक दर्शनासाठी जात असतात. या भाविकांची व्यवस्था चोखपणे लागावी, यासाठी संस्थानाच्या वतीने अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भक्तांच्या सोयीसाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आता यादरम्यान, शिर्डी साईबाबा संस्थान येथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या एका मुद्द्यावर संस्थानाच्या वतीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शिर्डी संस्थानाकडून भक्तांसाठी राबवण्यात येणाऱ्या महाप्रसादालयाबाबत घेतलेल्या या निर्णयाची माहिती संस्थानाकडून देण्यात आली आहे.
काय आहे निर्णय?
शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी माध्यमांशी बोलताना या निर्णयाबाबत माहिती दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शिर्डी संस्थानमध्ये दाखल होणाऱ्या भाविकांना भोजन प्रसादासाठी आता कूपन घेणं बंधनकारक करण्यात आलं आहे. इथे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय घेतल्याचं गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितलं आहे. या निर्णयामागची संस्थानची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे.
कुठे मिळणार भोजन प्रसादाचे कूपन?
“शिर्डी साईबाबा संस्थानामार्फत आशिया खंडातलं सर्वात मोठं प्रसादालय चालवलं जातं. इथे दररोज ४५ ते ५० हजार भाविक प्रसादाचा लाभ घेतात. पण काही लोक दारू पिऊन प्रसादालयात येतात. धूम्रपान करतात. त्यामुळे तिथे प्रसाद घेणाऱ्या भाविकांना त्रास होतो अशा काही तक्रारी संस्थानाकडे दाखल झाल्या होत्या. त्यामुळे साई भक्तांसाठी आजपासून दर्शन रांगेतच जिथे विधी प्रसादवाटप होतो, तिथेच प्रसादाच्या कूपनचं वाटप सुरू करण्यात आलं आहे”, अशी माहिती गाडीलकर यांनी दिली.
“धूम्रपान करणारे, मद्यपान करणारे लोक असतात. काही प्रमाणात गुन्हेगारीही वाढली आहे. त्यामुळे भक्तांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे”, असं ते म्हणाले.
भक्त निवासमध्येच नाश्ता व भोजनाचे कूपन मिळणार
“भक्त निवासमध्ये राहण्यासाठी येणाऱ्या भक्तांना नोंदणीच्या वेळीच नाश्ता व भोजनाचे कूपन दिले जातील. इथल्या रुग्णालयात जे लोक येतात, त्यांच्या दोन नातेवाईकांनाही भोजनाचं व नाश्त्याचं कूपन दिलं जाईल. याव्यतिरिक्त काही सहली, पालख्या येतात. ऐनवेळी काही लोक येतात ज्यांना आधी जेवण करायचं असतं आणि नंतर दर्शन करायचं असतं. ती व्यवस्थाही प्रसादालयात करण्यात आली आहे. पण कोणत्याही कारणाने कोणताही भक्त भोजनाशिवाय राहणार नाही याची पूर्ण दक्षता साईबाबा संस्थानने घेतली आहे”, असंही गाडीलकर यांनी सांगितलं.