राहाता : महिनाभरापूर्वी साईबाबा संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांना हत्या करण्यात आली होती. या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असतानाच आता पुन्हा शिर्डीत घरगुती वादातून पोटच्या मुलानेच वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना शिर्डी मध्ये ६ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली होती. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मुलाविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा आज मंगळवारी दाखल करण्यात आला. या घटनेमुळे शिर्डीत एकाच खळबळ उडाली आहे.दरम्यान आरोपी शुभम गोंदकर यास येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास १५ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दत्तात्रय शंकर गोंदकर (वय ५४ रा. शिर्डी) असे मयताचे नाव आहे. शुभम गोंदकर (वय २९) असे आरोपी मुलाचे नाव आहे. शिर्डी मध्ये ६ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास सदरची घटना घडली होती. मयत दत्तात्रय शंकर गोंदकर हे त्यांच्याच घरी त्यांची पत्नी संजीवनी गोंदकर हिच्याबरोबर काहीतरी कारणाने झटापट करत असताना मुलगा शुभम गोंदकर यांनी वडील दत्तात्रय गोंदकर यांना पाईपने मारहाण करत भिंतीवर ढकलून दिले .त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शिर्डी येथील रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला.
मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्याचे कोणाला कळू नये म्हणून शुभम याने वडिलांचा अकस्मात मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगितल्याने याबाबत शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. आधी हत्या दडवण्याचा प्रयत्न करत नामानिराळा राहण्याचा प्रयत्न शुभम याने केला. घटनेबाबत पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.शवविच्छेदन अहवालातून आरोपी शुभम गोंदकर याचे पितळ उघडे पडले.
आकस्मिक मृत्यूच्या नावाखाली वडिलांच्या हत्येच्या पापापासून पासून सुटू पाहणाऱ्या मुलाविरोधात पोलिस उपनिरीक्षक निवांत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुभम याच्या विरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढिल तपास सुरू आहे.