सहाव्या वेतन आयोगाचा फरक देणे, साहाय्यक अनुदान १०० टक्के द्यावे, सफाई कामगारांना मोफत घरे द्यावीत, यांसह इतर अनेक मागण्यांसाठी शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी परिषदेसमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
राज्य नगर परिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. प्रशासन बळकटीकरण अंतर्गत तसेच मुख्याधिकारी पदे भरताना नगर परिषद कर्मचाऱ्यांचा समावेश करावा, यांसह एकंदर १४ मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. संघटनेने २५ फेब्रुवारी रोजी संपाची नोटीस दिली होती. परंतु शासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी संपास सुरुवात केली. या संपात शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे २५३ कर्मचारी सहभागी झाले आहेत. शासनाने  संपाची दखल न घेतल्यास १० एप्रिलपासून पाणीपुरवठा, अग्निशमन या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही संपात सहभागी होतील, असा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन संघटनेचे सचिव माधव पाटील, शिरपूर वरवाडे नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष देविदास माळी, उपाध्यक्ष संजय हसवाणी, सचिव भाईदास भोई यांनी केले आहे. कर्मचाऱ्यांच्या भूमिकेस नगराध्यक्षा संगीता देवरे, माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, नगरसेवक राजगोपाल भंडारी, सुरेश बागूल आदींनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा