शिवसेनेला मुंबईच्या वरळीत मोठा धक्का बसला आहे. वरळीतील शेकडो शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय निवासस्थान ‘वर्षा’वर शिंदे गटात प्रवेश केला आहे. कार्यकर्त्यांचा हा प्रवेश युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे. वरळी विधानसभा मतदारसंघाचे आदित्य ठाकरे आमदार आहेत. बालेकिल्ल्यातच शिवसैनिकांनी साथ सोडल्यानंतर आदित्य ठाकरेंची पुढील वाटचाल कठिण ठरणार आहे.

“पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे…”; शिवसेनेची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका

दसरा मेळाव्याच्या काही दिवसांआधीच आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची वरळीतील कार्यकर्त्यांनी साथ सोडली आहे. “आदित्य ठाकरेंना मिळणाऱ्या धक्क्यांची ही सुरुवात आहे. यानंतर त्यांना आणखी मोठमोठे धक्के बसतील”, असा इशारा शिंदे गटातील नेते किरण पावसकर यांनी दिला आहे. वरळीत अनेक समस्या आहेत. उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते, आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री होते, तरीही हे प्रश्न सुटू शकले नाहीत. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये संताप होता, असे पावसकर म्हणाले आहेत. हिंदूत्वाची वज्रमुठ उशिरा का असेना आदित्य ठाकरेंना आठवली, असा टोलाही त्यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्त संस्थेची बोलताना लगावला.

“सगळेच आनंद दिघे नसतात, तर काही…”; शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा निवासस्थानी शिक्षक संघटनेच्या सदस्यांनी भेट घेतली आहे. शिक्षण क्षेत्रातील समस्यांबाबत ही भेट झाल्याची माहिती मिळत आहे. ऐतिहासिक दसरा मेळावा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा परपंरेनुसार शिवाजी पार्कवर होणार आहे. तर बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यावर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे. “काँग्रेसच्या भारत जोडोला पेंग्विन सेनेची साथ, दसरा मेळाव्याच्या गर्दीसाठी काँग्रेस देणार हात!” असा आरोप शेलार यांनी केला आहे.

Story img Loader