होळी रात्री १० च्या आत पेटवण्याचं बंधन राज्य सरकारने घातलं आहे. तसंच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी डिजेबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यासही बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद गृहविभागाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक नियमावलीत करण्यात आली आहे. दरम्यान यावरुन भाजपा नेते टीका करत असून हिंदू सणांना विरोध का? अशी विचारणा करत आहे. त्यांच्या या टीकेला शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Holi 2022: “तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात; आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच”

‘महाराष्ट्रातला विरोधी पक्ष ज्या पद्दतीने वागत आहे त्यांनी त्यांचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून काही सुचना घ्यायला हव्यात. संपूर्ण देशात आजही करोनाची भीती कमी झालेली नाही. चीनमध्ये पुन्हा एकदा काही ठिकाणी लॉकडाउन लागत आहे. केंद्र सरकारनेदेखील काही निर्बंधांचं पालन करा असं सुचवलं आहे. महाराष्ट्र सरकारने त्यासंदर्भात काही नियम, निर्बंध ठेवले असतील तर राज्याच्या आणि लोकांच्या हितासाठी आहेत,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“विरोधी पक्षाने विरोध करु नये. विरोधासाठी विरोध करत लोकांचे जीव धोक्यात घालण्याच्या मानसिकतेतून बाहेर पडण्यास ते तयार नाहीत. सत्ता येत नसल्याने वैफल्य येऊ शकतं, पण ते अशा टोकाला जाऊ नये की आपल्या राज्यात आपल्याच लोकांचे बळी जावेत आणि त्याचेही राजकारण करत सरकारला धारेवर धरता यावं हे चुकीचं आहे. इतकं क्रूर पद्दतीचं, अमानुष राजकारण महाराष्ट्रात यापूर्वी कोणी केलं नव्हतं आणि करु नये,” असंही यावेळी ते म्हणाले.

राम कदम ट्वीटमध्ये काय म्हणाले आहेत?

“महाराष्ट्र सरकारचा एवढा टोकाचा हिंदू सणांना विरोध का? आता पुन्हा त्यांनी होळी आणि रंगपंचमी साजरी करण्यावर निर्बंध घातलेत आहो तुम्ही घाबरत असाल.. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आम्हाला कळते स्वतःची कशी काळजी घ्यायची. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात. तुमच्याच भाषेत काय उखाडायचे ते उखाडा. आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच,” असं राम कदम ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

गृहखात्याने जारी केलेले नियम

रात्री १० वाजताच्या आत होळी पेटवणे बंधनकारक आहे

होळीदरम्यान डीजे लावण्यावर कायदेशीर बंदी आहे.

दहावी तसेच बारावी वर्गाच्या परीक्षा सुरु असल्यामुळे लाऊडस्पीकरचा आवाज मोठा केल्यास कारवाई होईल.

होळी साजरी करताना मद्यपान तसेच बिभत्स वर्तन केल्यास कारवाई होईल.

होळी खेळताना महिला तसेच मुलींनी खबरदारी घेण्याचे आवाहन.

कोणत्याही जातीधर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये.

धुलीवंदनाच्या दिवशी जबरदस्तीने रंग लावू नये, पाण्याचे फुगे फेकू नयेत.

दरम्यान, गृह विभागाने जारी केलेली नियमावली तसेच करोना प्रतिबंधक नियमांचेही पालन करावे, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

Story img Loader