राज्यात आजपासून महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार घातला असून त्यावरून दोन्ही बाजूंना टीका-टिप्पणी होत असताना दुसरीकडे ठाकरे गटाकडून सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे. सामना अग्रलेखातून ठाकरे गटानं कोल्हापुरातील एका प्रकाराचा उल्लेख करत शिंदे गट आणि भाजपा युतीला लक्ष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“ही सर्व मंडळी येऊन गेल्यावर मठातील गाईंनी प्राणत्याग केला”

“गाईस गोमाता मानणाऱ्यांचे राज्य सध्या महाराष्ट्रात व केंद्रात सुरू आहे. त्यामुळे माणसांपेक्षा गाईंना सर्वाधिक संरक्षण मिळत असेल असा समज होता. अशा परिस्थितीत कोल्हापूर जिल्हय़ातील कणेरी मठातल्या ५२ गाईंचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला तर आणखी पन्नासेक गाई गंभीर आहेत.कणेरी मठात पंचमहाभूत सुमंगलम लोकोत्सव सुरू आहे व या लोकोत्सवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मंत्री येऊन गेले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही मठात आले व ही सर्व मंडळी येऊन गेल्यावर मठातील गाईंनी प्राणत्याग केला”, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

“यासंदर्भात एखादा ‘हिंदू आक्रोश’ मोर्चा का निघाला नाही?”

“पालघरातील साधुकांड हे जर हिंदुत्वाचे हत्याकांड ठरवले जात असेल तर कोल्हापुरातील ५२ गोमातांचा मृत्यूसुद्धा हिंदुत्वाला वगैरे धक्कादायक मानावा लागेल. राज्यात ‘पाप’मार्गाने सरकार आले व त्या पापी सरकारचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मठातील गोशाळेत जाऊन आल्यावरच गाईंनी प्राण सोडावा या दुर्दैवास काय म्हणावे? एरवी गोमातांबद्दल जरा काही खुट्ट झाले की, रस्त्यांवर उतरणारे कथित हिंदुत्ववादी गोरक्षक कोल्हापुरात गोमातांचा हा असा सामुदायिक संहार होऊनही गप्पच कसे आहेत? यासंदर्भात एखादा ‘हिंदू आक्रोश’ मोर्चा का निघाला नाही?” असा सवाल अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.

“एवढं पोटात दुखण्यासारखं काय?” देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांवर हल्लाबोल; पोटनिवडणुकीवर बोलताना म्हणाले….

“संपूर्ण देशात गोमांस खाणे हा अपराध ठरला आहे. गोवंशहत्याबंदीचा कायदाच केला गेला आहे, पण ५२ गोमातांचा संशयास्पद मृत्यू हा प्रकार काही गोवंशहत्येत मोडत नाही व भाजप-मिंधे गटातील बाटग्या हिंदूंचे रक्तही त्यामुळे सळसळत नाही. दुसऱ्या एखाद्या राज्यात प्रकारे गोमृत्यू झाले असते तर महाराष्ट्रात फडणवीसांपासून बावनकुळ्यांपर्यंत व मुखदुर्बळ मिंध्यांपासून सगळ्यांनीच हिंदुत्व खतऱ्यात आल्याच्या गर्जना केल्या असत्या”, अशा शब्दांत ठाकरे गटाकडून राज्य सरकारवर टीका करण्यात आली आहे.

“सावरकरांचा विज्ञानवादी दृष्टीकोण उथळ हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?”

ज्या गोव्यात ‘गोमांस’ खुल्या बाजारात सरकारी कृपेने मिळते, त्या राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत कोल्हापूरच्या कणेरी मठात येऊन गाईंना चारा घालतात, गाईंचे आशीर्वाद घेतात हे ढोंग नाही तर काय? वीर सावरकर यांनी गाईस गोमाता म्हणण्यास नकार दिला. गाय हा एक उपयुक्त पशू आहे, असे ते म्हणत. वीर सावरकरांचा हा विज्ञानवादी दृष्टिकोन सध्याच्या उथळ आणि बेताल हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे काय?”, असाही सवाल ठाकरे गटाकडून भाजपाला आणि राज्य सरकारला विचारण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shisvena thackeray group slams cm eknath shinde government on kolhapur cow death pmw