ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. श्रीकांत शिंदे यांनी राजा ठाकूर या गुंडाला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊतांच्या या आरोपानंतर शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी राऊतांवर घणाघाती टीका केली आहे. आज राऊत यांच्या फोटोला चप्पल मारली आहे. त्यांनी असेच आरोप केले तर महिला सेनेला त्यांच्या घरात घुसायला वेळ लागणार नाही, असा इशारा म्हात्रे यांनी दिला आहे. तसेच राऊतांनी सांभाळून बोलावे, असा सल्ला म्हात्रे यांनी दिला आहे.
आम्ही मुंबईहसह संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करणार आहोत
शिंदे गटाचे नेते तथा कार्यकर्त्यांनी आज (२३ फेब्रुवारी) राऊतांविरोधात आंदोलन केले. यावेळी राऊत यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनादरम्यान म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “संजय राऊत यांच्याविरोधात आम्ही मुंबईहसह संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करणार आहोत. त्यांच्याविरोधात आम्ही प्रत्येक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार आहोत. संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आरोप करत आहेत. श्रीकांत शिंदे यांनी मला मारण्याची सुपारी दिली, असा आरोप राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी तोंड सांभाळून बोलावे,” असा सल्ला म्हात्रे यांनी राऊतांना दिला आहे. तसेच तुमच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे, याची आम्हाला कल्पना आहे. शिल्लक राहिलेली शिल्लक सेनादेखील शाबूत ठेवायची नाही, असा राऊत यांनी विडा उचललेला आहे,” अशी खोचक टीकाही म्हात्रेंनी केली आहे.
राऊत यांच्या घरात घुसायला वेळ लागणार नाही
“आज फक्त संजय राऊत यांच्या फोटोला चप्पल मारलेली आहे. जर राऊत असेच खोटे आरोप करत राहिले तर ही महिला सेना त्यांना सोडणार नाही. आम्हाला राऊत यांच्या घरात घुसायला वेळ लागणार नाही, ही बाब राऊत यांनी लक्षात ठेवावी,” असा इशारा शीतल म्हात्रे यांनी दिला आहे.
म्हणूनच धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांन मिळाले
“उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांसमोर उद्धव ठाकरे यांनी एक धनुष्यबाण दाखवले. तसेच भावनिक आवाहन केले. या धनुष्यबाणावर कुंकू आहे. ते आमच्या देवघरात असते, असे ते म्हणाले. मात्र ते धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांनीच त्यांना दिलेले आहे. कदाचित बाळासाहेब ठाकरे यांनादेखील तो धनुष्यबाण खऱ्या शिवसैनिकांकडे जावा, असे वाटत असेल. म्हणूनच धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांन मिळाले आहे,” असेदेखील शीतल म्हात्रे म्हणाल्या.