करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. १ मेपर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली असून, कडक निर्बंधांच्या काळात शिवभोजन थाळी मोफत दिली जात आहे. मात्र, शिवभोजन थाळीच्या मुद्द्यावरून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे.
राज्यात दररोज होत असलेली मोठी रुग्णवाढ आणि आरोग्य सुविधांचा तुटवडा या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. करोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्यात १ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून, याची घोषणा करताना या काळात शिवभोजन थाळी मोफत देणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं होतं. शिवभोजन थाळीमुळे अनेकांना जेवण मिळत असल्याची दृश्ये सोशल मीडियावर शेअर केली जात असतानाच आता भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
“माननीय मुख्यमंत्री (मा .मु.) कुछ समझ में नही आया… मामु शिवभोजन थाळी खानेका है… लेकिन जानेका कैसे?”, असा सवाल करत गोपीचंद पडळकरांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना पोलीस अडवताना दिसत आहेत. तर काहींना घराबाहेर पडले म्हणून शिक्षा देताना दिसत आहे.
‘माननीय मुख्यमंत्री (मा .मु.) कुछ समझ में नही आया… मामु शिवभोजन थाळी खानेका है..लेकीन जानेका कैसे?’#गोलमाल#शिवभोजन_थाळी#lockdown#बिघाडी_सरकार pic.twitter.com/jkHXVZyB8E
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) April 17, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणून शिवभोजन थाळीकडे पाहिले जाते. ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाही, रोजच्या जेवणाची भ्रांत आहे. ज्यांच्या घरात चूल पेटत नाही, अशा निराश्रित, निराधार, बेघर नागरिकांना रोजच्या जेवणाची सुविधा शिवभोजन थाळी योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध करून देण्यात आली आहे.