सांगली : सांगली, मिरजेसह जिल्ह्यात बुधवारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरात चौका-चौकात शामियाने उभा करून शिव पुतळयाचे पूजन करण्यात आले होते. भगव्या पताका, दिवसभर ध्वनीवर्धकावर शाहिरी पोवाडे आणि पारंपारिक वेषात सायंकाळी निघालेल्या मिरवणुकामुळे सर्व वातावरणच आज  शिवमय झाले होते.

मध्यरात्री सांगलीतील शिवाजी महाराजाच्या पुतळ्याजवळ फटाययांच्या आताषबाजीमध्ये महिलांच्या पाळणा गीतांने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या भोवती विद्युत रोषणाई करण्यात आली असून दिवसभर राजकीय, सामाजिक, प्रशासकीय अधिकारी, तरूण मंडळांनी छत्रपतींना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मिरज शहरात सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, मिरज सुधार समितीच्यावतीने किसान चौक येथे खास  शामियाना उभा करून शिवपुतळ्यास अभिवादन करण्यात आले.यावेळी आमदार इद्रिस नायकवडी, अल्लाबक्ष काझी, विवेक  शेटे, विलास देसाई आदींसह  शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सायंकाळी जवाहर चौकातून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांची भव्य मिरवण्ाूक शिवाजी पुतळ्या पर्यंत काढण्यात आली. मिरवणुकीत ढोल ताशांबरोबरच मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

दरम्यान, प्रशासनाच्यावतीने जिल्हा परिषदेपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेमध्ये जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिकेचे आयुक्त  शुभम गुप्ता, पोलीस अधिक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते.

पदयात्रा सुरू होण्यापुर्वी शालेय मुलांनी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात दांडपट्टा, तलवारबाजी, लाठी, काठी आणि  मल्लखांब खेळाची प्रात्यक्षिके सादर केली. महापालिकेच्या प्रधान कार्यालयात आयुक्त गुप्ता यंाच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शहरात ठिकठिकाणी आज गणेशोत्सव मंडळांनी शिवपुतळ्याची प्रतिष्ठापना करत शिवजन्मोत्सव  साजरा केला. तसेच जिल्हा बँक, बाजार समिती यांच्या प्रधान कार्यालयातही आज शिवरायांना अभिवादन करण्यात आले.

Story img Loader