मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजी निर्दोष आहेत असे सांगतानाच एल्गार परिषद भरवणारेच खरे गुन्हेगार आहेत, असा आरोप शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी पराश मोने यांनी केला आहे. एल्गार परिषदेत जातीयवादी पत्रके आणि पुस्तके वाटण्यात आली असा दावाही त्यांनी केला. मात्र, यात त्यांनी कोणत्याही नेत्याचे नाव घेणे टाळले आहे.
संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी आज ‘गुरुवर्य सन्मान महामोर्चा’ काढण्यात आला. पुण्यातही भिडे गुरुजी समर्थकांनी नदीपात्रात ठिय्या आंदोलन केले. संभाजी भिडेंवरील खोटे गुन्हे मागे घ्यावे, मिलिंद एकबोटे यांची सुटका करावी, तसेच संभाजी भिडे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात येत आहे, अशा घोषणा देऊन भिडे गुरुजी समर्थकांनी विरोध दर्शवला.
शिवप्रतिष्ठानचे पराश मोने म्हणाले, कोरेगाव भीमा हिंसाचारात संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांचा सहभाग नाही हे आम्ही आधीपासूनच सांगत आहोत. मंगळवारी विधान सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भिडे गुरुजींविरोधात पुरावा सापडलेला नाही असे स्पष्ट केले. सखोल चौकशीनंतरच त्यांनी ही माहिती दिली. त्यांच्या या विधानाचे आम्ही स्वागत करतो, असे त्यांनी सांगितले. पोलिसांनी आमच्या आंदोलनाला परवानगी नाकारल्याने आम्ही निराश झालो. पोलिसांनी आमचा अधिकार नाकारला असला तरी कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलन करु, असे मोने यांनी सांगितले. एल्गार परिषदेत जातीयवादी पत्रके वाटणाऱ्यांविरोधात आम्ही पुरावे दिले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
भिडे गुरुजी आम्हाला आई- वडिलांपेक्षा कमी नाही. आज त्यांनी आमच्यावर देश, देव आणि धर्मासंबंधीचे चांगले संस्कार केले. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची बदनामी केली जात होती. याविरोधात आम्ही आक्रोष मोर्चा काढला, असे त्यांनी नमूद केले. तुकाराम महाराजांचे वंशज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनी भिडे गुरुंजीना पाठिंबा दर्शवला आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.