सांगली : दुर्ग मोहिमेस निघालेल्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यकत्यांचे वाहन आंबेनळी घाटात पलटी होउन झालेल्या अपघातात अंकलखोप (ता. पलूस) येथील १५ कार्यकर्ते जखमी झाले असून यापैकी तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर वेगवेगळ्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
शिवप्रतिष्ठानच्यावतीने उमरठ ते रायगड या दुर्ग मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील अनेक गावातून शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते उमरठ येथे रवाना झाले. अंकलखोप येथून २१ कार्यकर्ते पिकअप वाहनांने महाबळेश्वर मार्गे काल रात्री निघाले होते. यावेळी पोलादपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेनळी घाटातील कुंभळवणे गावच्या हद्दीत मध्यरात्री वाहन पलटी झाले. वाहनातील २१ पैकी १५ जण जखमी झाले असून यापैकी सहा जणांना किरकोळ दुखापत झाली असल्याने उपचारासाठी महाडमधील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमी झालेल्या विश्वंभर जोशी यांना निओ लाईफ हॉस्पिटल महाड येथे, सागर हलोळ्ळी यांना माणगाव येथील ग्रामीण रूग्णालयात तर सत्यम पुजारी यांना रानडे हॉस्पिटल महाड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातातील अन्य जखमींची नावे अशी पवनकुमार जाधव, यश उपाध्ये, पवन साळुंखे, ओंकार खामकर, अविष्कार शिंदे, कुणाल चौगुले, रोहन नळवणकर, संकेत जाधव, अक्षय पाटील, गणेश गायकवाड अशी आहेत. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच आ. डॉ. विश्वजित कदम यांनी तात्काळ संपर्क साधून चौकशी केली. सर्व जखमींना तात्काळ सांगलीतील भारती हॉस्पिटलमध्ये उपचाराची सज्जता करण्याची सूचना देण्यात आली. आज सायंकाळपर्यंत जखमींना खास रूग्णवाहिकेने सांगलीला हलविण्यात येणार असल्रूाची माहिती स्थानिक नातेवाईकाकडून मिळाली.