‘त्या’ प्रकरणाची ३८ मिनिटांची सीडी आमच्याकडे – जिल्हाप्रमुख
शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड आता भाजपसोबत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात ते पवित्र होणार आहे. आम्ही मात्र या प्रकरणाचा पाठपुरावा करू. आमच्याजवळ सुद्धा ३८ मिनिटांची सीडी असल्याचे सांगत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी खळबळ उडवून दिली. जिल्ह्यातील संतप्त शिवसैनिकांनी आमदार राठोड यांचा हिशेब चुकता करणार असल्याचा इशारा दिला.
शिवसेनेतील बंडखोर आमदारांविरोधात आज, सोमवारी शिवसैनिकांचा संताप अनावर झाला. असंख्य शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करत बंडखोर आमदारांचा पुतळा जाळला. यवतमाळात आल्यानंतर त्यांचा समाचार घेणार असल्याचे यावेळी राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्याशी संबंधित बंडखोर आमदार संजय राठोड, तानाजी सावंत, पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली. त्यामुळे या सर्वांना त्याची किंमत चुकवावी लागेल, अशी प्रतिक्रिया यावेळी पदाधिकऱ्यांनी व्यक्त केली.
स्थानिक टिळक भवनातून दुपारी मोर्चा काढण्यात आला. दत्त चौकातून थेट राठोड यांच्या कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी अडवले. दत्त चौकात बंडखोर आमदारांविरोधात घोषणाबाजी करत त्यांचे पुतळे जाळण्यात आले. बंडखोर आमदार तीन हजार कोटींमध्ये विकल्या गेल्याचा आरोप यावेळी शिवसेना पदाधिकऱ्यांनी केला. या आमदारांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू असला तरी आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत. येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवून आम्ही शिवसेनेची ताकद दाखवून देणार असल्याचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी सांगितले. कठीण परीस्थितीत शिवसेनेची साथ सोडणाऱ्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा पदावरून हकालपट्टी करणार असल्याचा इशारा पिंगळे यांनी दिला.
राठोड यांना पक्षाने राज्यमंत्री ते कॅबिनेट मंत्रीपद दिले, तरीही त्यांनी गद्दारी केली. त्यांचा हा नालायकपणा आम्ही खपवून घेणार नाही. त्यांचे मतदारसंघात फिरणेसुद्धा मुश्कील केल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार यांनी दिला. आमदार राठोड यांनी जिल्ह्यात दुसरे नेतृत्व उभे राहणार नाही, यासाठी सातत्याने षडयंत्र रचले. सहकाऱ्यांना संपवण्याचा कार्यक्रम त्यांनी प्राधान्याने राबवला. याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. आता तळ्यात-मळ्यात अशी भूमिका घेणाऱ्यांची आम्ही गय करणार नसल्याचे जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांनी सांगितले. येत्या ३० जून रोजी राठोड यांचा वाढदिवस आहे. यादिवशी लागणारे त्यांचे पोस्टर्स फाडून टाका, असे यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे यांनी सांगितले. राठोड हे ‘बेन्टेक्स’ नेते आहेत. त्यांच्याशी संबंधित पूजासारखी अनेक प्रकरणे दडलेली आहेत, ती सर्व प्रकरणे उजेडात आणू आणि निष्ठावंताच्या सहकार्याने आणि परिश्रमाने शिवसेना आणखी बलवान बनवण्याचा प्रयत्न करू, असे संतोष ढवळे म्हणाले.
मोर्चापूर्वी टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या निषेध सभेत जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, विश्वास नांदेकर, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, प्रवीण पांडे, बाबू पाटील जैत, गजानन डोमाळे, किशोर इंगळे, प्रवीण शिंदे, ॲड बळीराम मुटकुळे, चितांगराव कदम, आदींसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसैनिक, पदाधिकारी स्थानबद्ध
रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याप्रकरणी तसेच पुतळा जाळल्याप्रकरणी आज दत्त चौक येथे शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. पोलिसांनी कितीही वेळा अटक केली तरी आम्ही गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नसल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.