शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पडत्या काळात सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील तमाम शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यावर अढळ निष्ठा ठेवून त्यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. पक्षात बंडखोरी करणाऱ्यांना शिवसैनिक कधीही माफ करणार नाही, असा निर्धारपूर्वक दावा शहर व जिल्हा शिवसेनेच्या बैठकीत करण्यात आला. यावेळी काही महिला पदाधिकाऱ्यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना परत या म्हणून भावनिक आवाहन करताना अश्रू ढाळले.
सात रस्त्यावर शासकीय विश्रामगृहात दुपारी झालेल्या या बैठकीत जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे, दुसरे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, शहरप्रमुख गुरूशांत धुत्तरगावकर यांच्यासह माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी जिल्हाप्रमुख अजय दासरी, दीपक गायकवाड, भाऊसाहेब आंधळकर, महिला आघाडीच्या अस्मिता गायकवाड, सीमा पाटील, प्रताप चव्हाण, विजय पुकाळे, सुनील शेळके, सदाशिव येलुरे, तुकाराम म्हस्के आदी शेकडो नवे-जुने शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. मात्र माजी मंत्री दिलीप सोपल, दक्षिण सोलापूरचे माजी आमदार रतिकांत पाटील, दिलीप माने हे या बैठकीकडे फिरकले नाहीत.
भाजपाकडून वारंवार जाणीवपूर्वक त्रास –
जिल्हाप्रमुख बरडे म्हणाले, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दादरच्या शिवतीर्थावर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना तुमच्या पदरात घालतोय, त्यांना सांभाळा, असे भावनिक आवाहन केले होते. परंतु आता बाळासाहेब ठाकरेंच्या नावानेच उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करण्याचे पाप होत होत आहे. आम्ही सर्व शिवसैनिक गद्दारांना कदापि माफ करणार नाही. भाजपाकडून वारंवार जाणीवपूर्वक त्रास दिला जात असतानाही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून देशात सर्वोत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी सत्तेचा मोह कधीही ठेवला नाही. त्यांच्यावर सोलापूरच्या शिवसेनेची निष्ठा अढळ राहील.”, असा दावा त्यांनी केला.
यावेळी शहरप्रमुख गुरूशांत धुत्तरगावकर यांनीही ठाकरे घराण्यावरील सोलापूरच्या शिवसैनिकांची कधीही ढळणार नाही. कितीही संकटे आली तरीही आपण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.”, अशी ग्वाही दिली.
आम्ही अखेरच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी
पक्षात होत असलेल्या घडामोडींवर भाष्य करताना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी बंड मागे घेऊन परत यावे, असे आवाहन करताना महिला आघाडीच्या अस्मिता गायकवाड यांना अश्रू आवरणे अशक्य झाले होते. भाऊसाहेब आंधळकर यांनीही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच महाराष्ट्राला आणि सामान्य शिवसैनिकांना पुढे नेणारी आहे. आम्ही अखेरच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगितले.
पंढरपूर व माढा विभागाची स्वतंत्र बैठक होणार
या बैठकीस पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे व माढा विभागाचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे हे उपस्थित नव्हते. उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहण्यासाठी पंढरपूर व माढा विभागाची स्वतंत्र बैठक होणार असल्याचे बरडे यांनी स्पष्ट केले.
‘ते’ पाकिस्तानातही जातील
शिवसेनेत झालेल्या बंडामध्ये सहभागी झालेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव आमदार शहाजी पाटील यांच्यावर जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे यांच्यावर जोरदार टीका केली. आमदार शहाजी पाटील हे शिवसेनेच्या जीवावर मोठे झाले. परंतु ते नेहमीच पैशाला चटावलेले आहेत. पैशासाठी पाकिस्तानातून जरी आॕफर आली तरी ते पाकिस्तानातही जातील, अशा शब्दात बरडे यांनी त्यांच्यावर प्रहार केला.