शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला प्रकरणी आज भाजपाचे आमदार नितेश राणे कणकवली न्यायालयामध्ये शरण आले होते त्यानंतर युक्तिवाद झाला. न्यायालयाने त्यांना येत्या ४ फेब्रुवारी पर्यंत म्हणजेच पुढील दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, सरकार पक्षातर्फे दहा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली गेली होती.
आमदार नितेश राणे आज कणकवली दिवाणी न्यायालयात सरेंडर झाले आहेत. तर कणकवली दिवाणी न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती आमदार नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी दिली आहे.
आमदार नितेश राणे आज दुपारी तीन वाजता कणकवली प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सलीम शेख यांच्या न्यायालयात हजर होण्यासाठी रवाना झाले होते. त्यानंतर ते न्यायालयात शरण आल्यावर न्यायालयीन कोठडीचा आदेश झाला. यानंतर फिर्यादी पक्ष आणि राणे यांच्या वकिलांना युक्तिवाद करण्याची संधी देण्यात आली.
Nitesh Rane Surrender Live : आमदार नितेश राणे दोन दिवसांची पोलीस कोठडी
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा प्रचार प्रमुख कणकवली करंजे येथील शिवसैनिक संतोष परब याच्यावर कणकवली करंजे येथील घरी जाताना दि.१८ डिसेंबर रोजी त्यांच्या दुचाकीला मागवून इनोवा गाडीने धडक दिली होती. गाडीला धडक दिल्यानंतर दुचाकी त्यांच्या पायावर पडली आणि गाडीतील संशयितांनी येऊन त्यांच्या छातीवर धारदार वस्तूने हल्ला केला अशी त्याने तक्रार दिली होती त्यानंतर चौघांना फोंडाघाट तपासणी नाक्यावर ताब्यात घेण्यात आले होते तर सचिन सातपुते याला दिल्लीवरून अटक झाली होती आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, आमदार राणे यांचे खाजगी सचिव राकेश परब यांच्या नावाचा उल्लेख तपासात आल्यानंतर त्यांना पोलिसांनी नोटीस दिली होती.
या नोटीसीनंतर आमदार नितेश राणे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश सावंत, राकेश परब आदिनी जिल्हा न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन साठी अर्ज केला होता. या अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याच्यावर अटकपूर्व जामीन साठी अर्ज केला. मुंबई उच्च न्यायालयाने जामीनअर्ज फेटाळल्यानंतर आमदार राणे हे सर्वोच्च न्यायालयात गेले होते सर्वोच्च न्यायालयाने त्यांना न्यायालयात शरण येण्यास सांगितले होते तोपर्यंत दहा दिवस त्यांना अटकेपासून सवलत देणारे आदेश न्यायालयाने दिले होते.
या दरम्यान दोन दिवसापूर्वी जिल्हा न्यायालयामध्ये नियमित जमीन मिळावा म्हणून आमदार राणे यांनी अर्ज दाखल केला. जिल्हा न्यायालयाने नियमित जामीन अर्ज काल मंगळवारी फेटाळला. त्यांनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र ती मागे घेत्याचे अँड सतिश माने शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर राणे कणकवली न्यायालयामध्ये शरण आले होते.
यादरम्यान आमदार राणे यांचे वकील संग्राम देसाई आणि सरकार पक्षाचे वकील प्रदीप घरत यांनी युक्तिवाद केला. यावेळी सरकार पक्षातर्फे अँड प्रदीप घरत यांनी राणे यांना पोलीस कोठडी मिळावी म्हणून युक्तिवाद केला. आमदार राणे आणि त्यांचा पीए राकेश परब यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यासाठी दहा दिवसांची पोलीस कोठडी मिळावी म्हणून मागणी केली. तर राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी पोलिस कोठडीची गरज नाही असे युक्तिवाद करताना म्हणाले की, कणकवली पोलीस ठाण्यात जाऊन आमदार नितेश राणे यांनी पोलिस तपासात सहकार्य केले आहे त्यामुळे पोलीस कोठडीची गरज नाही. न्यायालयात सुनावणी सुरू असताना न्यायालय आवारात आणि शहरात दंगल पथक, पोलीस तैनात करण्यात आले होते.