बीड : शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचा रविवारी पहाटे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोटार अपघातात मृत्यू झाला. ते ५२ वर्षांचे होते. ते बीडहून मुंबईला जात होते. मराठा आरक्षणासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीला ते उपस्थित राहणार होते. पहाटे पाचच्या सुमारास भातण बोगदा ओलांडण्याआधी हा अपघात झाला. त्यांना तातडीने उपचार मिळू शकले नाहीत, असा आरोप त्यांच्या वाहन चालकाने केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी स्थानिक पातळीवरचा पाच दिवसांचा नियोजित दौरा सोडून मध्यरात्रीच मेटे मुंबईकडे निघाले होते. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या विनायक मेटे यांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मराठा महासंघाच्या चळवळीतून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपले नेतृत्व प्रस्थापित केले होते. पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ विधानपरिषदेचे सदस्य राहणारे ते राज्यातील एकमेव नेते होत.
मराठा आरक्षणाच्या विषयावरील बैठक रविवारी सकाळी ११ वाजता बोलावली असल्याचा निरोप आल्यानंतर रात्रीच मेटे मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. त्यांच्या मोटारीत त्यांचे सुरक्षारक्षकही होते. मेटे यांचे प्राथमिक शिक्षण दहावीपर्यंत झाल्यानंतर ते मुंबईत कामासाठी मामाकडे गेले. उपजिविकेसाठी त्यांनी सुरुवातीला रंगकाम, भाजीपाला विक्री अशा प्रकारची कामे त्यांनी केली. दरम्यानच्या काळात मराठा महासंघाचे नेते अण्णासाहेब पाटील यांच्या संपर्कात आल्याने मेटे चळवळीत ओढले गेले. आपल्या कौशल्यावर त्यांनी महासंघात स्थान निर्माण केले.
१९९५ च्या निवडणुकीपूर्वी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी मराठा महासंघाबरोबर भाजपची युती केली आणि यातूनच युतीची सत्ता आल्यानंतर वयाच्या २९ वर्षी १९९६ ला विनायक मेटे यांची पहिल्यांदा विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्ती झाली. सोमवारी बीडमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
‘आयआरबी’ म्हणते.. विनायक मेटे यांना अपघातानंतर रुग्णालयात नेण्यात आमच्याकडून विलंब झालेला नाही, असे मुंबई-पुणे महामार्गावर टोल वसुलीचे काम करणाऱ्या ‘आयआरबी’ने म्हटले आहे. अपघाताची माहिती आमच्या कार्यालयाला सकाळी ५.४८ वाजता मिळताच पथक ५.५३ ला घटनास्थळी पोहोचले. ५.५८ वाजता गाडीतून सर्व जखमींना बाहेर काढून ६.१० वाजता रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे ‘आयआरबी’ने नमूद केल़े
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाबाबत शंका उपस्थित झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले असून, पोलिसांनी तपासासाठी आठ पथके तयार केली आहेत. मेटे यांच्या निधनाची घटना अतिशय दुर्दैवी असून मराठा समाजासाठी सातत्याने लढणारा नेता हरपला आहे, अशा भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत. मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी मेटे यांनी अनेक आंदोलने केली. मराठा आरक्षणासाठी ते आग्रही होते.
भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल : सामाजिक कार्य आणि उपेक्षित समाज घटकांच्या विकासातील मेटे यांचे योगदान मोठे आहे.
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री : मेटे यांच्या निधनाने राजकारणाची कधीच भरून न निघणारी हानी झाली आहे.
शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष : मेटे यांनी गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात मराठा समाजासाठी अत्यंत मोलाची कामगिरी केली. त्यांनी सामाजिक प्रश्नासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणी करून भूमिका घेतली. प्रश्नांची मांडणी करीत असताना त्यांनी कधी कटुता येऊ दिली नाही.
अजित पवार, विरोधी पक्षनेते : मराठवाडय़ाचे सुपुत्र, सामाजिक जाण असलेले व्यक्तिमत्त्व, सतत मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, अशाप्रकारची भूमिका मांडणारे, हे व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले.
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख : मराठा समाजातील बांधवांना, भगिनींना न्याय मिळवून देण्यासाठी सतत झगडणारे शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अकाली अपघाती झालेले निधन मनाला वेदना देणारे आहे. तळागाळातील प्रत्येक कार्यकर्त्यांला न्याय देण्याची त्यांची भूमिका होती.
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष : मराठा आरक्षणाच्या लढय़ात मेटे यांचे मोठे योगदान होते. मेटे यांच्या निधनाने एक संघर्षशील नेता हरपला आहे.