महाराष्ट्राचे आतापर्यंतचे सर्वाधिक चर्चित आणि सतत वादग्रस्त वक्तव्ये करून नागरिकांचा रोष ओढवून घेणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अलिकडेच त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. राज्यपालांचा राजीनामा आज (१२ फेब्रुवारी) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. राज्याच्या राज्यपालपदी आता रमेश बैस यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान, कोश्यारी यांना राज्यपालपदाच्या जबाबदारीतून मुक्त केल्यानंतर आता महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. शिवसेना नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, “राज्यपालांनी खूप आधीच राजीनामा द्यायला हवा होता.”
दानवे म्हणाले की, “भगतसिंह कोश्यारी यांची सतत महापुरुषांचा अपमान करणारी वक्तव्ये येत होती. महाविकास आघाडीने अनेकदा त्यांचा विरोध केला होता. राज्यपालांची भूमिका नेहमी मराठी माणसाच्या विरोधात होती. महाराष्ट्राचा अपमान करण्यासाठीच त्यांना भाजपाने किंवा केंद्रातल्या मोदी सरकारने पाठवलंय की काय अशी स्थिती होती. आम्ही त्यांच्याविरोधात अनेकदा मोर्चा काढला, अधिवेशनात आवाज उठवला होता.”
“महाराष्ट्रातली घाण गेली”
अंबादास दानवे अधिक आक्रमक होत म्हणले की, “भाजप किंवा केंद्राने जाणीवपूर्ण मराठी माणसाचा अपमान करण्यासाठी राज्यपालांना राज्यात पाठवलं होतं. त्यांनी नेहमीच महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न केला. जनमत हे कोश्यारींच्या विरोधात असूनही त्यांना जास्त दिवस पदावर कायम ठेवलं. परंतु सरकारने आता त्यात दुरुस्ती केली आहे. परंतु मी काही सरकारचे आभार मानणार नाही. उलट महाराष्ट्रातली घाण गेली असंच मी म्हणेन.”
हे ही वाचा >> शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या पुढील पिढीतच जुंपली
मोदींपुढे गाऱ्हाणं मांडलं
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा राज्यपाल आणि मोदी यांची भेट झली. या भेटीवेळी राज्यपालांनी या पदाची जबाबदारी अधिक काळ सांभाळण्यास असमर्थता दर्शवली होती. या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करावं अस गाऱ्हाणं त्यांनी पंतप्रधानांसमोर मांडलं होतं. त्यानंतर आता राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारून रमेश बैस यांची राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.