औरंगाबाद आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका एकत्रितरित्या लढविण्याचा निर्णय शिवसेना आणि भाजपने घेतला आहे. दोन्ही पक्षांनी सोमवारी घेतलेल्या संयुक्त पत्रकारपरिषदेत भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ही घोषणा केली. त्यानुसार, औरंगाबादमध्ये शिवसेना ६४ आणि भाजप ४९ जागांवर लढेल. तर नवी मुंबईसाठी शिवसेना ६८ आणि भाजप ४३ असे जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सरकारमध्ये एकत्र असलेल्या या दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड अंतर्गत धुसफूस पहायला मिळत होती. त्यात दोन्ही महानगरपालिकांमधील स्थानिक नेते जागावाटपाच्या मुद्द्यावर तडजोड करण्यासही तयार नव्हते. त्यामुळे शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, राज्यातील एमआयएम पक्षाचा वाढता प्रभाव आणि नवी मुंबईत गणेश नाईकांच्या रूपाने असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व मोडून काढण्याची चालून आलेली संधी पाहता शिवसेना आणि भाजपने हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.