“भाजपा आणि सेना युती होणारच आहे. आम्ही समन्वयातून जागांची अदलाबदल करणार आहोत. राज्यात भाजपसेना युती हाच एक पक्ष आहे. त्यामुळे माध्यमातून येणाऱ्या भाजप शिवसेना युती तुटणार या बातम्या खोट्या आहेत”, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले. वाई नगरपालिकेच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व विजय संकल्प बूथ संमेलनात चंद्रकांत दादा पाटील बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, किसनवीर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मदन भोसले, नगराध्यक्ष डॉ प्रतिभा शिंदे, वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष चंद्रकांत काळे, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी आगामी विधानसभेसाठी अनेक जागांची अदलाबदल करावी लागेल हे स्पष्ट केलं. “वाई विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असला तरी तो भाजपाला मिळावा यासाठी मुख्यमंत्री व मी स्वतः प्रयत्न करत करत आहोत. भाजपला हा मतदारसंघ मिळेल आणि मदन भोसले खूप मोठ्या मताधिक्क्यांनी विजयी होतील याची मला खात्री आहे. सध्या राज्यात भाजपमध्ये सामील होणाऱ्यांची संख्या मोठी आहे, खूप मोठ्या अपेक्षेने भाजपचा जनाधार वाढत आहे. पुढच्या आठ दिवसात राज्याच्या राजकारणात आणखीन बदल होतील”, असे सांगून चंद्रकांत पाटील म्हणाले केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकासकामांचा पाढा वाचून दाखवनला.
पूरग्रस्त भागात सरकारने केलेल्या मदतकार्याचाही पाटील यांनी पाढा वाचला. “पूरग्रस्त परिस्थितीत सरकारने लोकांची खूपच काळजी घेतली. सर्वांना मदत पोहोचविण्याची शासनाने शिकस्त केली आहे. लहान मुले शाळा आणि गावठाणांचे पुनर्वसन होईलच परंतु राज्य सरकारने आत्ताच्या पूरग्रस्त परिस्थितीत तळागाळात जाऊन काम केले. २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर आणि शुद्ध पाणी पिण्याचे पाणी पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे.” मदन भोसले यांनी आपल्या भाषणामध्ये महाबळेश्वर पाचगणी या या पर्यटनस्थळांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून उभारण्यासाठी शासनाने सहकार्य करावे. वाई शहरातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा असे सांगत काही झाले तरी विजय संकल्प संमेलन यशस्वी होऊन भाजपचा उमेदवार विजयी झालेला असेल असे सांगितले. या कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.