विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत निर्णय दिला आहे. राहुल नार्वेकर यांनी आम्हाला अपात्र का केलं नाही? सर्वोच्च न्यायालयाने सुभाष देसाईंच्या याचिकेवर जे निर्देश दिले होते त्यावरुन आम्हाला वाटत होतं की एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र होतील असं वाटलं होतं. मात्र आता राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला आहे त्यामुळे ती भाजपाने लिहून दिलेली स्क्रिप्ट होती असं आम्हाला वाटतं आहे असं अनिल परब म्हणाले. इतकंच नाही तर शिवसेना आणि ठाकरे कधीच वेगळे होऊ शकत नाहीत असाही दावा त्यांनी केला.
काय म्हणाले अनिल परब?
शिवसेना आणि ठाकरे कधीही वेगळे होऊ शकत नाही. शिवसनेचे सगळे चांगले वाईट दिवस आम्ही बघितले आहोत. त्यामुळे आज जर हे आम्हाला सांगत असतील की बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय. त्यांना जर काही अडचण होती, तर तेव्हाच राजीनामा द्यायला हवा होता. आम्ही सैनिक आहोत, पक्षाच्या प्रमुखांनी जो निर्णय घेतला, तो आम्ही मान्य करतो, त्यावर आम्ही प्रश्न विचारत नाही, असं अनिल परब यांनी म्हटलं. महाराष्ट्रातल्या लहान मुलांना विचारा शिवसेना कुणाची ते उत्तर देतील असंही अनिल परब म्हणाले. माझ्याकडे जे फुटले त्यांची यादी आहे. त्या ४० आमदारांपैकी २५ जणांनी बाळासाहेब ठाकरेंना बघितलेलंही नाही.
आमची मशाल सगळीकडे धगधगते आहे
आमची मशाल आता सगळीकडे धगधगतेय, त्याचाच त्यांना त्रास होतोय. त्यामुळे या मशालीची ताकद त्यांना लवकरच कळेल. यातल्या कित्येक लोकांनी बाळासाहेबांना पाहिलं नाही, ते म्हणतात आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जातोय. जर या लोकांना काही अडचण होती, तर मविआचं सरकार स्थापन करतानाच त्यांनी सांगायला हवं होतं की, आम्हाला मंत्रीपद नको, आम्ही मंत्रिमंडळात येणार नाही. आम्ही पण यातून गेलो होतो, काय दवाब टाकला जातो हे आम्हालाही माहित आहे, असं म्हणत अनिल परब यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरच्या माझा कट्टा या कार्यक्रमात अनिल परब यांनी ही टीका केली आहे.
गोगावलेंचा व्हीप आम्ही मान्य करणार नाही
भरत गोगावलेंचा व्हीप आम्हाला मंजूर करायची गरज नाही. जर सर्वोच्च न्यायालयाने आमच्या विरोधात निकाल दिला तर आम्हाला वेगळ्या पक्षाची नोंदणी करण्याचा अधिकार आहे. आम्हाला अपात्र ठरवण्यात आलेलं नाही. व्हीप अमान्य करणं दुसरी बाब आहे पक्ष विरोधी कारवाई करणं. त्यांच्या लेखी पक्षविरोधी कारवाई आम्ही केली मग आम्हाला त्यांनी (राहुल नार्वेकर) अपात्र का ठरवलं नाही? असंही अनिल परब म्हणाले. तसंच जे काही नार्वेकर बोलले तो ड्राफ्ट लिहून आलेला आहे. सर्वोच्च न्यायालयात आम्ही गेलो आहोतच. त्यांनी व्हीप बजावावा आम्ही तो व्हीप मान्य करणार नाही प्रकरण सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतं ते पाहू असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.