Saamana Agralekh : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. त्यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्ताने सामनाच्या अग्रलेखातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. अमित शाह यांनी शिवसेना फोडून ती एकनाथ शिंदे यांच्या हाती दिल्याचे यात म्हटले आहे. यावेळी अग्रलेखात एकनाथ शिंदे यांचा तोतया असा उल्लेख करत, सध्या राज्यात सुरू असलेल्या अनेक घटनांवरही टीका केली आहे.

अमित शाह, एकनाथ शिंदेंवर टीका

अग्रलेखाच्या सुरुवातीला शिवसेना फुटीचा उल्लेख करत म्हटले की, “अमित शाह यांच्यासारखे लोक महाराष्ट्रात येतात. भाषणे करतात. आपल्या भाषणात ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव नाइलाजाने घेतात, पण बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या रक्षणासाठी निर्माण केलेली शिवसेनारूपी कवचकुंडले याच अमित शहांनी ‘मोडून’ ती मोड कुणा तोतया शिंदेंच्या हाती सोपवली. पानिपतात मात खाल्लेल्या युद्धभूमीतून काही मतलब्यांनी एक तोतया सदाशिवरावभाऊ उभा केला होता व त्याने राज्यावर दावा सांगितला होता. ही तोतयेगिरी नंतर उघड झाली होती. याचप्रकारे अमित शाह यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेस शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यासारखे ‘तोतये’ सदाशिवभाई निर्माण केले.”

मराठी माणूस जाती-पोटजातीत फाटला

राज्यात गेल्या वर्षभरापासून विविध जातींकडून आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. यामुळे राज्यातील सामाजिक वातावरणही चिघळलेले आहे. त्यावरही सामनाच्या अग्रलेखात भाष्य करण्यात आले आहे. “महाराष्ट्राला आज बाळासाहेब ठाकरे यांची पदोपदी आठवण येत आहे. महाराष्ट्र आज दरोडेखोरांच्या हातात आहे. मराठी माणूस जाती-पोटजातीत फाटला आहे. इतका फाटला आहे की, त्यास ठिगळही लावता येत नाही. मराठी म्हणून ज्यांना एक केले ते मराठा-मराठेतर, ओबीसी, धनगर, माळी, वंजारी, दलित अशा तुकड्याताकड्यांत फुटून एकमेकांशी वैर घेऊन लढत आहेत”, असेही या अग्रलेखात म्हटले आहे.

शेतकरी, बेरोजगारी आणि उद्योगांवरही भाष्य

अग्रलेखाच्या शेवटी सामनामध्ये राज्यातील शेतकरी, बेरोजगारी आणि उद्योगांवरही लिहिण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, “मराठी म्हणून भक्कम एकजूट उभारणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र भाजपच्या शाह-फडणवीसी राजकारण्यांनी गलितगात्र केला आहे. महाराष्ट्रात शेतकरी मरत आहे. मराठी तरुण बेरोजगारीच्या खाईत होरपळत आहे. महिलांवर बलात्कार आणि खुनी हल्ले सुरूच आहेत. महाराष्ट्राचे उद्योग लूटन शेजारच्या गुजरातमध्ये नेले जात आहेत.”

Live Updates
Story img Loader