मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत आगामी निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीबाबत रखडलेल्या चर्चेची कोंडी फोडली. उद्धव ठाकरे यांच्याशी युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, या भेटीत जागावाटपावर चर्चा झाल्याचे समजते.
काही दिवसांपासून युतीबाबत आणि शिवसेनेच्या अटींबाबत विविध चर्चा सुरू आहे. राज्यात मोठय़ा भावाची भूमिका मिळावी आणि १९९५ प्रमाणे सत्ता वाटपाचे सूत्र असावे, अशा अटी शिवसेनेने घातल्याने आणि मुख्यमंत्रीपदाबाबत आग्रही भूमिका घेतल्याने युती रखडल्याचे सांगण्यात येत होते. आचारसंहिता लागण्यास आता पंधरा-वीस दिवसच उरल्याने युतीबाबत काय तो निर्णय व्हावा या हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी रात्री मातोश्रीवर गेले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई या बैठकीवेळी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांच्यासह युतीबाबत चर्चा झाली. चर्चा सकारात्मक झाली. शेतकरी, सर्वसामान्य जनता, सरकारी योजना याबाबत उद्धव यांच्या सरकारकडून काही अपेक्षा आहेत. लोकहिताच्या कामांबद्दलच्या या भावनांशी भाजपही सहमत आहे. त्यामुळे दोघांना त्यावर काम करता येईल. त्याचबरोबर युतीबाबत अंतिम निर्णय लवकरच होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. शिवसेनेकडून मात्र कोणीही या बैठकीबाबत भाष्य केले नाही. मुख्यमंत्री दुपारी अचानक वाशिमचा दौरा अर्धवट सोडून परत आले होते. रात्री मातोश्रीवर जाण्याशी त्याचा काही संबंध होता का अशीही चर्चा रंगली होती.
विधानसभा जागावाटपाचे सूत्र
मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव यांच्यात चर्चेत विधानसभेला शिवसेनेला १३५ जागा तर भाजपला १४० जागा आणि रिपब्लिकन पक्ष, रासप आदी घटक पक्षांना १३ जागा देण्याचा मुद्दा चर्चेला आल्याचे समजते. मात्र, अंतिम निर्णय झालेला नाही.
दौरा अर्धवट सोडून मुख्यमंत्री मुंबईला परतले
गुरुवारी बुलडाणा आणि वाशिम दौऱ्यावर गेलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी अचानक दौरा अर्धवट सोडून मुंबईला परत आले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीबाबत तर्कवितर्क सुरू झाले. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रकृती उत्तम असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातर्फे सांगण्यात आले. फडणवीस गुरुवारी बुलडाणा आणि वाशिमच्या दौऱ्यावर होते. मात्र बुलडाणा व सिंदखेड राजा येथील सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस वाशिमला न जाता औरंगाबादमार्गे मुंबईला परतले. त्यामुळे फडणवीस यांची प्रकृती बिघडल्याची चर्चा सुरू झाली होती.
संधी दिल्यास पवारांविरोधात लढणार- जानकर
भाजपने संधी दिल्यास शरद पवार यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व पशुपालन मंत्री महादेव जानकर यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत बारामती, माढा, हिंगोली, परभणी व अमरावती आदी सहा लोकसभा मतदारसंघांची मागणी भाजपकडे करणार असल्याचे जानकर यांनी सांगितले.