तुल्यबळ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याचे आव्हान; जागा कायम राखण्यात पक्ष नेतृत्वाची कसोटी लागणार
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आखाडय़ात शिवसेना स्वबळावर दंड थोपटून उतरणार आहे. शिवसेनेने पक्ष कार्यकारिणीत ठराव ठेवून अधिकृतरीत्या जाहीर केल्याने निवडणुकीत तरी शिवसेना-भाजप युती दुभंगल्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. पश्चिम वऱ्हाडात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वबळावर शिवसेनेची वाट बिकट राहणार असल्याचे चित्र आहे. भाजपलाही शिवसेनेच्या मतदारसंघात उमेदवार देऊन संघर्ष करावा लागेल. तुल्यबळ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याचे मोठे आव्हान दोन्ही पक्षांपुढे राहील. पश्चिम वऱ्हाडातील लोकसभेच्या तीनपैकी दोन जागा शिवसेनेकडे तर, भाजपकडे एक जागा आहे. तळागाळात पाळेमुळे रुजलेल्या भाजपची बाजू शिवसेनेच्या तुलनेत निश्चितच उजवी राहणार आहे. युतीमध्ये मोदी लाटेत निवडून आलेल्या जागा कायम राखण्यात शिवसेना पक्ष नेतृत्वाची चांगलीच कसोटी लागणार आहे.
केंद्रात व राज्यात भाजप व शिवसेना युती सत्तेत आल्यापासून दोन्ही पक्षांमध्ये सातत्याने कुरबुरी सुरू आहेत. वर्चस्वाच्या लढाईत एकमेकांची उणेधुणे काढून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या आहेत. सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने भाजपला वारंवार वेठीस धरले, तर भाजपने मित्र पक्षाला विश्वसात न घेता अनेक एकतर्फी निर्णय घेऊन सेनेला धक्का दिला. दोन्ही पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण रंगू लागले. त्यामुळे दोन्ही पक्षातील दुरावा चांगलाच वाढला. सेनेची डोकेदुखी नको म्हणून भाजपने छुप्या पद्धतीने स्वबळाची तयारी सुरू केली. शिवसेनेच्या हे जिव्हारी लागल्याने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे सेनेने उघडपणे जाहीर केले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर दोन्ही पक्षांनी स्वबळाची तयारी सुरू केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पश्चिम वऱ्हाडाचा विचार केल्यास बुलढाणा आणि यवतमाळ-वाशीम मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे, तर अकोला मतदारसंघावर भाजपचे निर्विवाद वर्चस्व आहे. सेनेला अकोल्यात व भाजपला बुलढाणा आणि यवतमाळ-वाशीम मतदारसंघात नवीन उमेदवार द्यावा लागणार आहे. अकोला हा भाजपचा अभेद्य गड आहे. खासदार संजय धोत्रे यांनी सलग तीनवेळा एकहाती विजय प्राप्त करून जिल्ह्य़ावर मजबूत पकड निर्माण केली. विधानसभेच्या पाच जागांपैकी चार ठिकाणी भाजपचा भगवा फडकला आहे. जिल्‘ाातील महापालिका व बहुतांश नगर पालिका भाजपच्या ताब्यात आहेत. खा.धोत्रेंची पक्षावरही संघटनात्मक पकड प्रस्थापित असून, त्यांनी तळागाळात पक्ष रुजवण्यासोबतच बुथनिहाय नियोजन केले. खा.धोत्रेंनी स्वबळाची मशागत अगोदरपासूनच करून ठेवल्याने त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचे मोठे आव्हान शिवसेनेपुढे असेल. स्थानिक स्तरावर विचार केल्यास आ.गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह काहींची नावे लोकसभेसाठी चर्चेत आहेत. मात्र,राजकीय परिस्थिती पाहता ते फारसे इच्छुक नसल्याने शिवसेनेला उमेदवार आयात करावा लागणार असल्याची स्थिती आहे. अकोल्यात लढताना शिवसेनेला निश्चितच तारेवरची कसरत करावी लागणार आहे. बुलढाणा मतदारसंघात खासदार प्रतापराव जाधव यांनी दोनदा विजय मिळवून शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित केले. जिल्‘ाात शिवसेनेचे दोन आमदार आहेत. प्रतापराव जाधव यांचे दोन्ही विजय युतीत झाल्याने त्यामध्ये भाजपचाही वाटा होता. आता शिवसेनेला स्वबळावर लढताना भाजपलाही तोंड द्यावे लागणार आहे. प्रतापराव जाधव बुलढाणा जिल्‘ााचे संपर्क प्रमुखही आहेत. बुलढाण्यात नियुक्त्यांवरून शिवसेनेमध्ये गटबाजीचे वातावरण आहे. माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासोबत मतभेद असल्याने दोन गट पडल्याचे दिसून येते. शिवाय जिल्हा परिषद निवडणुकीपासून भाजपसोबत प्रतापराव जाधव यांचे वितुष्ट निर्माण झाले. त्यामुळे भाजपनेही स्वबळाची तयारी केली आहे. भाजपकडून कृषिमंत्री व पालकमंत्री पांडुरंग फुंडकर, ज्येष्ठ आमदार चैनसुख संचेती, आ.संजय कुटे आदी अनेक सक्षम मंडळीपैकी एकाच्या गळ्यात लोकसभेच्या उमेदवारीची माळ पडू शकते. बुलढाणा मतदारसंघ कायम राखण्याचे आव्हान शिवसेनेपुढे असेल. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व शिवसेनेच्या भावना गवळी करीत आहेत. आतापर्यंत या मतदारसंघावर शिवसेनेने आपले वर्चस्व अबाधित ठेवले. मात्र, गेल्या काही वर्षांत शिवसेनेमध्ये गटबाजी उफाळून आली. महसूल राज्यमंत्री संजय राठोड आणि खा.भावना गवळी यांच्यात वर्चस्वाचा सामना रंगला आणि सेना गटातटात विभागली गेली. याचा फटका लोकसभेत बसण्याची चिन्हे आहेत. दोन जिल्ह्य़ांचा हा मतदारसंघ असल्याने जिल्ह्य़ांच्या प्रतिनिधित्वाचाही वाद होतोच. लोकसभा लढण्यासाठी भाजपने तयारी केली आहे. यवतमाळ येथे भाजपकडे अनेक इच्छुक आहेत. वाशीम जिल्ह्य़ातून आ.राजेंद्र पाटणी दावेदार म्हणून समोर येऊ शकतात. ऐनवेळी उमेदवार आयातही केला जाऊ शकतो. पक्षातील गटबाजी लक्षात घेता यवतमाळ मतदारसंघ शिवसेनेसाठी अवघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकेकाळी शिवसेनेने पश्चिम विदर्भावर मजबूत पकड निर्माण झाली होती. मात्र, कालांतराने ती पकड सैल झाली. गटातटात शिवसेना विभागली गेली. त्याचा फटका प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेला बसल्याचे दिसून आले. आजही पश्चिम विदर्भातील चारपैकी तीन खासदार शिवसेनेचे आहेत. मात्र, ते युतीमध्ये निवडून आले. स्वबळावर शिवसेना लोकसभेच्या तीनही जागा राखू शकेल का,असा प्रश्न निर्माण होतोच. तीन खासदार असतांनाही त्याचा प्रभाव विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसून आला नाही. भाजपने विदर्भात आपला गड मजबूत केला असताना शिवसेनेला अस्तित्वाचा संघर्ष करावा लागत आहे.
स्थानिक पातळीवर सेनेची कोंडी
गेल्या काही निवडणुकांमध्ये विदर्भात भाजपला घवघवीत यश मिळाले. भाजपला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर सेनेची कोंडी होते. परिणामी, महाराष्ट्रासह विदर्भात निवडणुकीच्या दृष्टीने संघटन मजबूत करण्यासाठी सेनेने रणनीती आखली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या संघटनात्मक बळकटीकरणावरही विशेष भर आहे. विदर्भात यश मिळाल्याशिवाय राज्यात एकहाती सत्ता काबीज करणे शक्य नसल्याची जाणीव सेनेला आहे.
प्रत्येक ठिकाणी शिवसेनेची ताकद
प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेची ताकद असून,आणखी जोमाने काम करावे लागणार आहे. बुलढाणा मतदारसंघातही शिवसेनेचे वर्चस्व आहे. स्वबळावर निवडणुका लढण्याच्या दृष्टीने शिवसेनेने नियोजन केले आहे. सर्व ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार सज्ज आहेत.
– प्रतापराव जाधव, सेना खासदार व संपर्क प्रमुख, बुलढाणा.