दापोली नगरपंचायत निवडणूक तीन आठवडय़ांवर आलेली असताना सर्व राजकीय पक्ष जाहीर प्रचारापासून अद्याप दूर राहिलेले आहेत. या पाश्र्वभूमीवर शिवसेनेने पत्रकार परिषदांवर भर दिला असून पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांच्यानंतर दोन दिवसांतच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव आणि युवानेते योगेश कदम यांनी दापोलीत पत्रकार परिषद घेतली. या वेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत शिवसेना-भाजप युती शक्य आहे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, भाजपच्या सूत्रांनीही पक्षश्रेष्ठींचा आदेश आल्यास दापोलीत युती करावीच लागेल, असे स्पष्ट केले.

योगेश कदम यांना दापोली मतदारसंघातून विधानसभेसाठी उमेदवारी मिळण्यासाठी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी यापूर्वीच जाहीर मोच्रेबांधणी सुरू केली आहे. त्यातून माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेला धक्का बसला आहे. मात्र दळवी यांनी पक्षश्रेष्ठींकडे स्वत:चा प्रभाव सिद्ध करत दापोलीतील नगरपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांची सूत्रे स्वत:कडे ठेवण्यात यश मिळवले आहे. या घडामोडीनंतर पक्षाच्या जिल्हास्तरीय नेत्यांनी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर दापोलीत पत्रकार परिषदा घेण्याचे धोरण अवलंबण्यास सुरुवात केली आहे. या वेळी सूर्यकांत दळवी यांच्या अनुपस्थितीत इतर शिवसेना नेत्यांना सामील करण्यात येत आहे.

योगेश कदम यांनी दापोलीतील पहिल्याच पत्रकार परिषदेला शिवसेना-भाजप युतीबाबत आशावाद व्यक्त केला. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत युतीवर शिक्कामोर्तब होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, भाजप गोटातूनही सध्या अशाच प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीसमोर नवा पेच निर्माण झाला असून प्रचाराच्या आखणीबाबत ते सावध भूमिकेत आहेत.

Story img Loader