राज्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा अंतिम तारीख उंबरठय़ावर असताना भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठांनी सर्वाच्या राजकीय आराखडय़ांना तडाखा दिला असला तरी कालपर्यंत ज्यांना शिव्याशाप दिले, त्यांच्याशी एका दिवसात मैत्री कशी करणार, असा प्रश्न उपस्थित करत स्थानिक पातळीवरील दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या घोषणेला तिलांजली दिल्याचे दिसत आहे. वरिष्ठांनी युतीची घोषणा केली असली तरी अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजप एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार असल्याचे निश्चित झाले असून भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्य़ातील १२ पैकी आठ ठिकाणी भाजपचे नगराध्यक्षपदांचे उमेदवार जाहीर करून त्यावर एक प्रकारे शिक्कामोर्तबच केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षातील इतर नेते आणि भाजपमधील नेते लहानसहान गोष्टींवरून एकमेकांवर तुटून पडण्याची एकही संधी वाया घालवत नसताना तसेच आगामी निवडणुकांमध्ये स्वबळ अजमाविण्यासाठी ठिकठिकाणी दोन्ही पक्षांकडून मेळावे, बैठकांची मालिका सुरू असताना दोन्ही पक्ष नगरपालिका निवडणुकांमध्ये एकमेकांविरुद्ध उभे ठाकणार हे स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गृहीत धरले होते. त्यानुसार नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात दोन्ही पक्षांकडून इच्छुकांनी तयारीही सुरू केली. काही जणांनी तर आपणास उमेदवारी मिळणारच म्हणून फलक तयार करण्यासही दिले. दिवाळीच्या मुहूर्तावर आपआपल्या भागात आकाशकंदील, शुभेच्छाकार्ड यांचे वाटप करीत दिवाळी मेळा, पहाट पाडवा, सांज पाडवा, फराळ महोत्सव यांचे आयोजन करून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सेतू बांधला असताना अचानक नगरपालिका निवडणुकांमध्ये युती करण्याची वरिष्ठ नेत्यांची घोषणा त्यांच्या पचनी पडणे अवघड झाले. स्थानिक पातळीवर भाजप आणि शिवसेना यांच्यातील संबंध पराकोटीचे दुणावले असताना एका दिवसात त्यांच्यात मैत्रीचे वारे वाहणे कठीण असल्याची जाणीव स्थानिक पदाधिकाऱ्यांनाही आहे. त्यामुळेच वरकरणी युतीचे नाटक जाहीर झाले असले तरी पडद्यामागे वेगवेगळी कारणे पुढे करून स्वतंत्र लढण्याची तयारी जवळपास दोन्ही पक्षांची झाली आहे.

नाशिक जिल्ह्य़ातील सहा नगरपालिकांमध्ये निवडणूक होत असून येवल्याचा अपवाद वगळता इतर पाच ठिकाणी भाजप, सेना दोन्ही पक्षांच्या इच्छुकांनी सर्व जागांवर अर्ज दाखल केले आहेत.

वरिष्ठांच्या आग्रहास्तव ओढूनताणून युती केलीच तर शिवसेनेकडे इच्छुकांचा असलेला ओढा लक्षात घेता त्याचा सर्वाधिक फटका शिवसेनेलाच बसेल, असे जिल्हा पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हे टाळण्यासाठी इच्छुकांनी अर्ज भरले असले तरी ११ नोव्हेंबपर्यंत माघारीची मुदत असल्याने अजून काहीही घडू शकते, हे सांगण्याची दक्षताही या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. जिल्ह्य़ात नगरपालिका निवडणुकांमध्ये आजपर्यंत विशेष कामगिरी नावावर नसणाऱ्या भाजपला बदलत्या परिस्थितीचा लाभ मिळण्याची आशा असल्याने त्यांचेही बाहू स्वबळासाठी फुरफुरत आहेत. काही जागांवर अडून बसत युतीच्या घोषणेचे तारू कसे फुटेल हे दोन्ही पक्षांकडून पाहण्यात येत आहे.

दुसरीकडे १२ नगरपालिका आणि एका नगरपंचायतीची निवडणूक होणाऱ्या जळगाव जिल्ह्य़ात तर भाजप आणि सेना यांच्यात विळ्या-भोपळ्याचे नाते आहे. त्यामुळे कित्येक दिवसांपासून दोन्ही पक्ष ‘एकला चालो रे’ किंवा स्थानिक आघाडय़ांशी जमवून घेत एकमेकांविरुद्ध उभे ठाकण्याच्या पूर्णपणे तयारीत असल्याने वरिष्ठ पातळीवरील घोषणेचा त्यांच्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी तर १२ नगरपालिकांपैकी आठ ठिकाणच्या नगराध्यक्षपदांच्या निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवारही जाहीर केले आहेत. त्यामुळेच वरिष्ठांनी काहीही निर्णय घेवो, स्थानिक पातळीवरील परिस्थितीची अधिक जानकारी असलेल्या दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपला स्वतंत्रपणे निर्णय कधीच घेऊन टाकल्याचेच दिसत आहे.