राज्यातील मंत्रिमंडळाचा फॉम्र्युला अद्याप ठरला नाही, मात्र भाजप व शिवसेना सत्तास्थापनेत एकत्र येणार आहे, असे मत राज्याचे नूतन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
राज्याची स्थापना झाल्यानंतरच्या प्रदीर्घ कालावधीनंतर प्रथमच चंद्रकांत पाटील यांच्या रूपाने कोल्हापुरातील युतीचा पहिला मंत्री मंत्रिमंडळात समाविष्ट झाला आहे. मंत्रिपदी निवड झाल्यानंतर पाटील यांचे रविवारी सायंकाळी करवीरनगरीत आगमन झाले. नियोजित वेळेपेक्षा अडीच तास उशिराने पाटील यांचे शहरात आगमन झाले तरी त्यांच्या स्वागतासाठी जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांचा व नागरिकांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता. कावळा नाका येथील रणरागिणी ताराराणी पुतळय़ाजवळ पाटील यांच्या स्वागतासाठी हजारोंची गर्दी झाली होती. फटाक्यांची आतषबाजी व ‘दादा तुम आगे बढो’ असा जयघोष करत कार्यकर्त्यांनी पाटील यांच्या मंत्रिपदाचा जल्लोष साजरा केला.
या वेळी पाटील यांनी पत्रकारांशी काहीकाळ संवाद साधला. त्यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, कोल्हापूरचे अनेक प्रश्न प्रलंबित असले तरी शहराच्या विकासासाठी भरीव कामगिरी करण्यात येईल. शहराबरोबरच जिल्ह्याचा सर्वागीण विकास करण्याकडे लक्ष देण्यात येईल.
रविवारी मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले. त्यामध्ये पाटील यांच्याकडे सहकार, वस्त्रोद्योग, पणन आदी खात्यांचा पदभार सोपवण्यात आला आहे. यासंदर्भात सहकारमंत्री पाटील म्हणाले, सहकारातील भ्रष्टाचार निपटून काढण्यात येईल. सहकाराला शिस्त लावण्याचा आपला प्रयत्न आहे. ऊसदरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आंदोलन करावे लागणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यानंतर सहकारमंत्री पाटील यांची शहराच्या मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. सुशोभित केलेल्या वाहनामध्ये पाटील यांच्यासह खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, महानगराध्यक्ष महेश जाधव, बाबा देसाई, राजाराम शिपुगडे, राहुल चिकोडे आदी होते. िबदू चौकातील शहर भाजप कार्यालयात पाटील यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.